जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे? अध्यक्षपदाच्या चर्चेला वेग

प्रतिनिधी,(सोमनाथ डोळे):- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीपेक्षा आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार? याचीच चर्चा अधिक रंगली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पातळीवर चर्चा सुरू होती. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी लक्षात घेता निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका विविध नेत्यांकडून मांडण्यात आली. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडणुकीचा मार्ग काहीसा गुंतागुंतीचा झाला आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आता अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव पुढे येत असल्याने निवडणुकीच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्षपद हे केवळ सहकार क्षेत्रातील पद नसून जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या राजकारणावर त्याचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड ही जिल्ह्याच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका पुढे आली होती. मात्र, प्रत्यक्षात अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता माघारीच्या काळात कोण माघार घेणार, कोणाला थांबवले जाणार आणि कोण मैदानात राहणार, यावर पुढील राजकीय गणित अवलंबून राहणार आहे.बँकेच्या सत्तेसाठी विविध राजकीय गटांनी आपापली ताकद दाखवली आहे. त्यामुळे अंतिम लढतीपूर्वी होणाऱ्या राजकीय चर्चा, तडजोडी आणि माघारींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

नेवासा सोसायटी मतदारसंघातून शंकरराव गडाख यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग बिनविरोध झाला आहे. त्याचप्रमाणे डॉ. सुजय विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख यांच्या संचालकपदाबाबत दाखल आक्षेपांवर सुनावणी झाली असून दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याची माहिती आहे.या घडामोडींमुळे आता जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची रचना हळूहळू स्पष्ट होत असून त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अध्यक्षपदासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव चर्चेत असताना उपाध्यक्षपदासाठी बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख यांचे नाव पुढे येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या संभाव्य समीकरणाकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हा बँकेच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची चर्चा आहे. डॉ. सुजय विखे पाटील सहकार क्षेत्रात सक्रिय होत असल्याने या निवडणुकीला राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राजकारणातील दावपेचांची जाण असलेले डॉ. सुजय विखे पाटील आता जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातही सक्रिय होत असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच अध्यक्षपदाच्या शर्यतीत डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव चर्चेत राहिले आहे. त्यामुळे संचालक मंडळाची समीकरणे स्पष्ट होत असताना त्यांच्या अध्यक्षपदाच्या दावेदारीची चर्चा अधिक ठळक होताना दिसत आहे.

अद्याप अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय झालेला नसला तरी डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हा बँकेचे पुढील अध्यक्ष होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय विश्लेषक, सहकार क्षेत्रातील जाणकार तसेच जिल्ह्यातील मतदारांमध्ये सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात माघारी आणि राजकीय बैठकांमध्ये कोणते नवे समीकरण आकाराला येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!