प्रवरेतील शिक्षणाच्या संधीचे सोने करा; कृषी क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी – युवराज आठरे

लोणी,(प्रतिनिधी):- ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवरेत विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचे सोने करून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. कृषी क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी असून विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी निर्माण करणारे उद्योजक होण्याचा प्रयत्न करावा. प्रत्यक्ष कृतीतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा लाभ घेत ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषीशास्त्र संस्थेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘दीक्षारंभ २०२६’ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, प्रवरा कृषीशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अमोल खडके, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. स्वरांजली गाढे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. काजल खंडागळे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी निळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवराज आठरे म्हणाले की, कृषी क्षेत्रातील ज्ञानामुळेच आज आपण पोलीस सेवेत कार्यरत आहोत. कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संघटनभावना आणि एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती दिसून येते. या भावनेतून मोठे कार्य उभे करता येते. प्रवरेत नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असून, डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून प्रवरेचा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न घडत आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवरेतील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून माहिती तंत्रज्ञानातील आधुनिक साधनांचा उपयोग अभ्यासासाठी तसेच कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी करावा. काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे : डॉ. सुस्मिता विखे पाटील

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रवरा संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या संस्थेत प्रवेश मिळाला असून, या संधीचा योग्य उपयोग करून आयुष्यात मोठे यश संपादन करावे. प्रवरा परिवाराचा घटक म्हणून संस्थेचे नाव मोठे करण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे.

कृषी क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पुढे जावे. मुलींच्या शिक्षणाला प्रवरेत विशेष प्रोत्साहन दिले जात असून, विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रगतीतही योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

कृषी शिक्षणातून शेतकऱ्यांचा आधार बनावे : डॉ. उत्तमराव कदम

प्रास्ताविकात डॉ. उत्तमराव कदम यांनी संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून प्रवरा शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण करीत असल्याचे सांगितले.

प्रवरेतील कृषी शिक्षणातून विद्यार्थी घडताना तो शेतकऱ्यांचा आधार बनावा आणि विविध क्षेत्रांत नेतृत्व करावे, यासाठी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. स्पर्धा परीक्षा, क्रीडा, विविध कौशल्ये आणि करिअरच्या संधींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. या संधींचा पुरेपूर लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल करिअर घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रांजल शिंदे आणि दिप्ती क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश जाधव यांनी केले, तर आभार प्रा. स्वरांजली गाढे यांनी मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!