प्रतिनिधी,(सोमनाथ डोळे):- राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील तुळजाभवानी मित्र मंडळाच्या वतीने तुळजाभवानी मातेची पायी ज्योत आणण्यासाठी गुरुवारी सकाळी तुळजापूर येथून ज्योतीचा प्रारंभ करण्यात आला. या धार्मिक उपक्रमात मंडळाचे सुमारे ७० युवक सहभागी झाले आहेत.
यावेळी तुळापूरचे सरपंच दादासाहेब हारदे तसेच तुळजाभवानी मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेची विधिवत पूजा व आरती करून पायी ज्योतीला प्रारंभ करण्यात आला. मातेच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात युवकांनी ज्योत घेऊन राहुरी तालुक्याकडे प्रस्थान केले.

तुळजाभवानी मातेप्रती श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी मंडळाचे युवक दरवर्षी तुळजापूर येथे जातात. यंदा सलग पाचव्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पायी ज्योत घेऊन येणाऱ्या भक्तांचे गावोगावी उत्साहात स्वागत केले जात असून, या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे.
तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर ज्योत घेऊन परतणाऱ्या युवकांमध्ये मोठा उत्साह असून, श्रद्धा, एकजूट आणि धार्मिक परंपरा जपण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.








