श्रीरामपुरात बेग-जेधे टोळीवर मकोकाच्या मागणीसाठी आमरण उपोषण

श्रीरामपूर,(प्रतिनिधी):- बेग आणि जेधे टोळीवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाज आणि श्रीरामपूरकरांच्या वतीने महात्मा गांधी चौकात आज, महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी, बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. जोपर्यंत संबंधित टोळ्यांवर मकोकाअंतर्गत कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

श्रीरामपूर शहरात सुमारे अडीच महिन्यांपूर्वी युवा हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैय्या यांची भरदिवसा हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी संताप व्यक्त करत संपूर्ण शहर सलग चार दिवस बंद ठेवले होते. तसेच या घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चाही काढण्यात आला होता.

या आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासनाकडून संबंधित गुन्हेगारी टोळ्यांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. मात्र, या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, त्यातून आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. विशेष म्हणजे, राजकीय मतभेद बाजूला ठेवून तालुक्याचे आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनीही आंदोलनात सहभाग नोंदविला.

दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवाईचा मुद्दा या आंदोलनातून पुन्हा ऐरणीवर आला आहे. बेग आणि जेधे टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा ठाम इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे.

error: Content is protected !!