राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्रीडा स्पर्धांना लोणीत उत्साहात प्रारंभ

लोणी,(प्रतिनिधी):- जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व असून, खेळामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मनातील उर्मी आणि ऊर्जा सकारात्मक पद्धतीने व्यक्त होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याबरोबरच संघभावना, संयम आणि परिश्रम यांची कास धरावी. डॉक्टरांनी स्वतःचे आरोग्य जपले, तरच ते समाजातील इतरांच्या आरोग्याची प्रभावीपणे सेवा करू शकतील. संघभावनेने आणि सातत्यपूर्ण परिश्रमाने यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी केले.

प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी येथील प्रवरा अभिमत विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे विश्वस्त ध्रुव विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुनील बुलार आणि क्रीडा शिक्षक नितीन गोर्डे आदी उपस्थित होते. दराडे म्हणाले की, प्रवरा परिसराला सहकाराचा समृद्ध वारसा लाभला आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून सहकाराच्या माध्यमातून या परिसराचा मोठा कायापालट झाला. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात प्रवरा संस्थेने दिलेले योगदान उल्लेखनीय आहे.

प्रवरा परिसरातील आरोग्यसेवा सुविधा अत्याधुनिक आणि प्रगत असून, कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अथक परिश्रमातून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे एक महत्त्वाचे आरोग्यसेवा केंद्र म्हणून विकसित झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.यानंतर भिमराज दराडे यांनी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाची घोषणा केली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे ३५ संघ लोणीत दाखल झाले आहेत. एकूण ४०० खेळाडू सहभागी झाल्याने परिसरात क्रीडा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपेश खाबीया यांनी केले, तर रीया छल्लानी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!