संगमनेर,प्रतिनिधी(सोमनाथ डोळे) :- यंदा मान्सूनच्या पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील कनोली व शेजारील पिंपरणे परिसरात शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीच्या पंचनाम्यांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या पथकाने शेतशिवारात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. सहाय्यक कृषी अधिकारी संकेत पाडळे आणि ग्रामपंचायत अधिकारी ज्योती सातपुते यांच्यासह संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांनी कपाशी, बाजरी, मका आदी खरीप पिकांची पाहणी करून झालेल्या नुकसानीची नोंद घेतली.
यावेळी परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून किती क्षेत्रावरील पीक बाधित झाले आहे, पिकांची सद्यस्थिती काय आहे आणि नुकसानीचे प्रमाण किती आहे, याबाबत सविस्तर माहिती संकलित करण्यात आली.
पिकांच्या नुकसानीची नोंद शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्धारित निकषांनुसार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पंचनाम्याच्या प्रक्रियेमुळे नुकसानीचे वस्तुनिष्ठ चित्र प्रशासनासमोर येण्यास मदत होणार असून, त्यानुसार शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीसाठी पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने पंचनामे लवकर पूर्ण करून शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.









