राहाता रायफल असोसिएशनची दमदार कामगिरी; पाच नेमबाजांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

लोणी,(प्रतिनिधी):-  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि. १ ते ३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत राहता पिस्तूल अँड रायफल शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या डीके स्पोर्ट्स क्लब, लोणी व राहता शाखेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत पदकांची कमाई करत पाच खेळाडूंनी अहिल्यानगर जिल्ह्यातून विभागीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.

१४ वर्षे वयोगटातील मुलींच्या PSR प्रकारात रिदा गयास शेख हिने सुवर्णपदक पटकावत प्रथम क्रमांक मिळविला. रिदा ही प्रवरा सेंटर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. याच वयोगटातील मुलांच्या PSR प्रकारात वेदांत गौरव बोर्डे याने सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक मिळविला. तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एकुरखे येथील विद्यार्थी आहे.

१९ वर्षे वयोगटातील मुलींच्या PSR प्रकारात उन्नती संजय वर्पे हिने सुवर्णपदक मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. उन्नती ही महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, पवारनगरची विद्यार्थिनी आहे. १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या प्रकारात कैवल्य अभिषेक शेजुळ याने रौप्यपदकासह द्वितीय क्रमांक मिळविला. तो प्रवरा सेंटर पब्लिक स्कूल, प्रवरानगरचा विद्यार्थी आहे.

तर १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या PSR प्रकारात शिवांश महेश कोल्हे याने कांस्यपदक मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. शिवांश हा प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगरचा विद्यार्थी आहे.

या पाचही खेळाडूंची अहिल्यानगर जिल्ह्यातून विभागीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

या खेळाडूंना राहता पिस्तूल अँड रायफल शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे प्रशिक्षक दीपक कृष्णा रणपिसे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. तसेच असोसिएशनचे पदाधिकारी प्रा. सुशांत शेळके, श्री. किरण रणपिसे, खजिनदार गणेश सर आणि सदस्य आकाश साबळे यांचे सहकार्य लाभले. असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार, भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ, राहता तसेच सरकारी वकील गौरव बोर्डे यांचेही मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

जिल्हास्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल पाचही खेळाडूंचे कौतुक करण्यात आले असून, आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामीण भागातील या खेळाडूंच्या यशामुळे राहता परिसरातील नेमबाजी क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळत असून, युवा खेळाडूंमध्ये नेमबाजीविषयी आत्मविश्वास आणि उत्साह वाढत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!