कोयत्याचा धाक दाखवून इर्टिगा कार पळवणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; 11.71 लाखांचा मुद्देमाल जप्त

शिर्डी,(प्रतिनिधी):- नाशिक येथून शिर्डीकडे जाणारी उबेर कार बुक करून चालकाला कोयत्याचा धाक दाखवत त्याचे हात-पाय बांधून कार पळवून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. पोलिसांनी या कारवाईत तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ११ लाख ७१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही घटना १ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे घडली होती. नाशिकहून शिर्डीकडे जाण्यासाठी उबेर कार बुक केल्यानंतर आरोपींनी प्रवासादरम्यान कोपरगाव परिसरात चालक सोपान दंडगुले यांना कोयत्याचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांचे हात-पाय बांधून त्यांना वांबोरी (ता. राहुरी) परिसरात ढकलून देण्यात आले. आरोपींनी चालकाची मारुती सुझुकी इर्टिगा कार आणि मोबाईल जबरीने चोरून नेला.

घटनेनंतर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. या तपासातून आरोपींचा माग काढत पोलिसांनी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी बदलापूर (जि. ठाणे) येथून शामसुंदर रविप्रताप गौड, सिद्धार्थ मिथवा चव्हाण आणि किसन दिग्विजय कहार या तिघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपींकडून जेऊर टोलनाक्याजवळ लपवून ठेवलेली सुमारे १० लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी इर्टिगा कार, मोबाईल आणि लोखंडी कत्ती असा एकूण ११,७१,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

error: Content is protected !!