लोणी पोलिसांची कारवाई; अधिक वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, 25.18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लोणी,(प्रतिनिधी):- परवानगीपेक्षा अधिक वाळूची वाहतूक करून पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी हायवा टिपरसह सुमारे 25 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) तसेच महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

 

लोणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी सुमारे 3.15 वाजता फत्याबाद पुलावर, मांडवे (ता. श्रीरामपूर) परिसरात ही कारवाई केली.

या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल विनोद  कुदनर यांनी फिर्याद दिली.  पोलिसांनी तुषार कैलास खर्डे (रा. पाचमोऱ्या, कोल्हार भगवती, ता. राहाता) आणि रामदास जाधव (पूर्ण नाव व पत्ता पोलिसांच्या नोंदीनुसार आडगाव, ता. राहाता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, मालुंजा खुर्द (ता. राहुरी) येथील लिलावातील 2 ब्रास वाळू वाहतुकीचा परवाना असताना संबंधित वाहनातून त्यापेक्षा अधिक म्हणजे सुमारे 6 ब्रास वाळूची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. वाहनचालक व वाहनमालक यांनी संगनमत करून विनापरवाना वाळू वाहतूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला.

कारवाईदरम्यान टाटा हायवा कंपनीचा टिपर क्रमांक MH 17 CV 1503 पोलिसांनी ताब्यात घेतला. या वाहनाची अंदाजे किंमत 25 लाख रुपये, तर त्यामध्ये आढळलेल्या 6 ब्रास वाळूची अंदाजे किंमत 18 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. असा एकूण 25 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 508/2026 नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोहेकॉ. वाल्मिक पारधी करीत आहे.

error: Content is protected !!