अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंचवीस वर्षांची राजकीय कारकीर्द संकल्प, संघर्ष आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित झाली आहे. विश्वमान्य नेतृत्व म्हणून जगात त्यांचा गौरव होत असून, विकसित भारताची वाटचाल साध्य करताना विरासत आणि विकास यांचा योग्य समन्वय त्यांनी साधला आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील वाटचालीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी जिल्ह्याचे प्रभारी लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, आमदार अक्षय कर्डीले, आमदार विवेक कोल्हे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेनंतर शहरातून ‘सेवा ज्योत यात्रा’ काढण्यात आली. यावेळी विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाविशाल गणपती मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती करण्यात आली.
२५ वर्षांचा प्रवास राष्ट्रसेवेच्या ध्येयाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीस २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, २५ वर्षांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीच्या राजकीय कारकीर्दीचा नाही, तर संकल्प, संघर्ष, संघटन, विकास आणि राष्ट्रसेवेच्या ध्येयाचा प्रवास आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकापासून सुरू झालेला प्रवास देशाच्या पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचला. प्रत्येक पदाच्या जबाबदारीत प्रशासन, विकास आणि जनसहभाग केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केला असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बदलत्या भारताचा प्रवास आपण पाहत आहोत. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हा मंत्र केंद्रस्थानी ठेवून गरीब, शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग, उद्योजक तसेच समाजातील वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम विविध निर्णयांच्या माध्यमातून झाले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
जनधन योजनेपासून डिजिटल व्यवहारांपर्यंत आणि घरकुल योजनेपासून आयुष्मान भारत योजनेपर्यंत विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून अंत्योदयाचा मंत्र प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य माणूस देशाच्या विकास प्रक्रियेशी जोडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
डिजिटल भारताची जगभरात ओळख
पंचवीस वर्षांच्या या कालखंडात भारतात मोठे परिवर्तन झाले आहे. डिजिटल भारत, मोबाईल बँकिंग, डिजिटल पेमेंट, सरकारी सेवा आणि ऑनलाइन व्यवहार सामान्य माणसाच्या हातात आले आहेत. यूपीआय ही भारताच्या डिजिटल क्षमतेची जगभरात चर्चिली जाणारी ओळख बनली असल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले.
आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या माध्यमातून उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारताला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न झाला. स्टार्टअप संस्कृती, संरक्षण उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भारताची स्वतंत्र ओळख निर्माण झाली असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
शेतकरी आणि युवकांसाठी नव्या संधी
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून नव्या संधी उपलब्ध होत आहेत. युवकांच्या कौशल्याला संधी देण्यासाठी ‘स्किल इंडिया’सारखे उपक्रम राबविले जात आहेत. ‘नारीशक्ती’ ही केवळ घोषणा न राहता विकासाची शक्ती बनली पाहिजे, हा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे अधिक ठळक झाला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
बदलता भारत आणि जगामध्ये भारताची बदलत असलेली प्रतिमा मोदी यांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावी झाली असून, त्याचा प्रत्येक देशवासीयाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
कलम ३७० पासून राम मंदिरापर्यंत ऐतिहासिक निर्णय
स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीपर्यंत, तिहेरी तलाकविरोधी कायद्यापासून मुस्लिम महिलांना दिलेल्या संरक्षणापर्यंत तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाशी संबंधित कलम ३७० हटविण्याच्या ऐतिहासिक निर्णयापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी या वाटचालीत घडल्या आहेत. विकसित भारताच्या निर्मितीचा हा नवा अध्याय असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध व्हावे, असे आवाहनही ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.







