दिल्ली येथे डॉ. सुस्मिता विखे पाटील यांना ‘शिक्षणरत्न पुरस्कार’ प्रदान

प्रतिनिधी,(सोमनाथ डोळे):- दिल्ली : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांना राष्ट्र सह्याद्री समूहाच्या वतीने दिल्ली येथे ‘शिक्षणरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्याने प्रवरा शैक्षणिक संकुलासह शिक्षण क्षेत्रातून या पुरस्काराचे स्वागत होत आहे.

या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यालयीन सचिव श्याम जाजू, दिल्ली येथील सुदर्शन न्यूजचे संस्थापक अध्यक्ष सुधीर चव्हाणके आणि अरुणनाथ गिरी महाराज यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण शिक्षणाच्या विकासातील योगदानाची दखल

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ घडवून आणणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. सुस्मिता विखे पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील कौशल्यांना वाव देणे आणि बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धती विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे, या व्यापक उद्दिष्टांच्या दिशेने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था कार्यरत आहे. या कार्याची दखल घेत मिळालेला ‘शिक्षणरत्न पुरस्कार’ हा संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा गौरव मानला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!