रोजगार मेळाव्यातून स्थानिक तरुण घडणार उद्योजक; उद्योगमंत्री उदय सामंत

शिर्डी,(प्रतिनिधी):- ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना केवळ नोकरी मिळवून देणे, हा रोजगार मेळाव्याचा उद्देश नसून त्यांच्या कौशल्यानुसार योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि स्थानिक पातळीवर उद्योजक घडविण्यासाठी पाठबळ देणे हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

कोकमठाण येथील आत्मा मालिक संकुलात आयोजित ‘आनंद नोकरी मेळावा २०२६’ मध्ये ते बोलत होते. या मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या कौशल्यविकासाला आणि उद्योजकतेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमाला खासदार भाऊसाहेब वाकचौरे, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार विवेक कोल्हे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे तसेच आत्मा मालिकचे परमानंद गिरीजी महाराज यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्यादरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पाच तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये मान्यता पाटील, मेघना ऋषिकेश, साईराज पाटील आणि पायल पवार या चार तरुणांना ‘जेसीबी’ कंपनीमध्ये, तर समीर राऊत याला ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनीमध्ये नियुक्तिपत्र देण्यात आले.

या नियुक्त्यांमुळे ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. स्थानिक युवकांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार मिळावा आणि त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नमूद केले.

ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीच्या शोधात मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची वेळ येऊ नये, या उद्देशाने ‘आनंद नोकरी मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला. देशातील नामांकित कंपन्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून, सुमारे १२५ कंपन्यांच्या माध्यमातून पाच हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

तरुणांच्या कौशल्यानुसार भरती प्रक्रियेला प्रोत्साहन देणे आणि बेरोजगार युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी मिळाल्यास त्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. त्याचबरोबर भविष्यात उद्योजक होण्याची इच्छाही बळावेल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

‘आनंद नोकरी मेळावा २०२६’च्या माध्यमातून परिसरातील तरुणांना कंपन्यांशी थेट संपर्क साधण्याची संधी उपलब्ध झाली आहे. रोजगाराच्या संधींसोबतच युवकांच्या कौशल्यांचा विकास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होईल. आगामी काळातही अधिकाधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

error: Content is protected !!