कोपरगाव,(प्रतिनिधी):- कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथे गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या कथित अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वनविभागाचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, शासकीय वाहनाची तोडफोड करून कारवाईदरम्यान जप्त केलेला ट्रॅक्टर आणि त्यातील एक ब्रास वाळू जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींना कोपरगाव न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
वनविभागाचे पथक शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कोळगावथडी येथील राखीव वनक्षेत्रात अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी गेले होते. या पथकात वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुळकर, वनपाल सचिन शिंदे, वनरक्षक सुरेश भोसले, अर्जुन खेडकर, पोलीस शिपाई भगीरथ पंचमुख आणि वाहनचालक अक्षय ससे यांचा समावेश होता. गोदावरी नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक आणि साठवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पथकाने एका ट्रॅक्टरवर कारवाई केली होती.
या कारवाईची माहिती संबंधितांना समजल्यानंतर ३५ ते ४० जणांनी वन कर्मचाऱ्यांचा रस्ता अडविल्याचा आरोप आहे. त्यानंतर जमावाने लोखंडी रॉड, लाकडी काठ्या आणि कोयत्यांच्या साहाय्याने शासकीय वाहनावर हल्ला करून त्याची तोडफोड केली. तसेच वन कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देत शासकीय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यादरम्यान कारवाईसाठी ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर आणि त्यातील एक ब्रास वाळू जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेत वनपाल सचिन लहानू शिंदे (वय ४७) आणि वनरक्षक सुरेश नवनाथ भोसले (वय ३७, दोघेही रा. अहिल्यानगर) हे दोन कर्मचारी जखमी झाले. शासकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात १४ नामनिर्दिष्ट आरोपींसह ३५ ते ४० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दीपक चंद्रभान मोरे (वय ३२), आकाश नंदकिशोर निंबाळकर (वय २९), देवराम वाल्मीक कोळपे (वय ३९), वसीम मोहम्मद शेख (वय ३०) आणि कृष्णा जनार्दन काळे (वय ३५, सर्व रा. कोळगावथडी, ता. कोपरगाव) यांच्यासह प्रतीक मोहन कोळपे (वय २४), जालिंदर भागवत पांढरे (वय ३८) आणि राहुल रवींद्र निकाळे (वय २८, सर्व रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, भारतीय वन अधिनियम आणि महाराष्ट्र गौण खनिज कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे पुढील तपास करीत आहेत. या घटनेत सहभागी असलेल्या अन्य संशयितांचा शोध घेण्यासह अवैध वाळू वाहतुकीच्या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.








