कोल्हार प्रतिनिधी, (अरुण बोरुडे) :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे कोल्हार भगवतीपूर नगरीत आगमन झाले आहे. या पुतळ्यामुळे कोल्हार परिसरातील शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता शिवस्मारकाचा भव्य अनावरण सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे.
शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी कोल्हार बसस्थानक परिसरात उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारक उद्यानाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या प्रगतीची माहिती घेत संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. उद्यानाचे सुशोभीकरण अधिक आकर्षक आणि देखणे करण्यासाठी आवश्यक बदलांबाबतही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शिवस्मारकाचा अनावरण सोहळा भव्य, दिव्य आणि अविस्मरणीय व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून साकार होत असलेले हे शिवस्मारक कोल्हारच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे. शिवप्रेमी आणि तरुणांकडून अनेक दिवसांपासून होत असलेल्या मागणीला या स्मारकाच्या माध्यमातून मूर्त स्वरूप मिळत आहे. अनावरण सोहळ्याला डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे कोल्हारमध्ये आगमन होताच शिवप्रेमींनी उत्साहात स्वागत केले. पुतळ्याचे दर्शन घेताना शिवप्रेमींच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंदाची भावना दिसून आली. महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारे हे स्मारक कोल्हारच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, स्वाभिमान, न्याय, लोककल्याण आणि सुशासनाचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावेत, तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजावी, या उद्देशाने कोल्हार बसस्थानक परिसरात भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येत आहे.
शिवस्मारक उद्यान भविष्यात शिवप्रेमींसाठी प्रेरणास्थान आणि नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या स्मारकाच्या माध्यमातून स्वराज्याचा इतिहास आणि शिवरायांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
शिवस्मारकाचा अनावरण सोहळा हा केवळ पुतळ्याचे अनावरण नसून, कोल्हारच्या एकजुटीचे, शिवप्रेमाचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरावा, अशी अपेक्षा डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी व्यक्त केली. गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन सोहळ्याच्या नियोजनात सक्रिय सहभाग घ्यावा. ग्रामस्थ, शिवप्रेमी आणि तरुणांच्या सामूहिक सहभागातून हा कार्यक्रम उत्साहात, शिस्तबद्ध आणि दिमाखात पार पाडावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिवस्मारक उद्यानाच्या पाहणीप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, शिवप्रेमी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आगमनामुळे कोल्हारमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अनावरण सोहळ्याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. शिवरायांच्या शौर्याचा, स्वराज्याच्या विचारांचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर करणारा हा सोहळा कोल्हारच्या इतिहासातील अविस्मरणीय पर्व ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.








