अवघ्या ४०व्या वर्षी गौरव गायकवाड यांचे निधन; आश्वी परिसरावर शोककळा

अश्वी,(प्रतिनिधी):-आश्वी खुर्दच्या मातीत जन्म घेऊन स्वकर्तृत्वाच्या बळावर पुणे शहरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे युवा उद्योजक गौरव (बन्टी) पांडुरंग गायकवाड यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अवघे ४० वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने आश्वी खुर्दसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

गौरव गायकवाड हे आश्वी खुर्दचे भूमिपुत्र असून प्रवरा बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी पांडुरंग मुरलीधर गायकवाड यांचे ते चिरंजीव होत. आश्वी-लोणी परिसरात बालपण गेलेल्या गौरव यांनी उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथे आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. बुद्धिमत्ता, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी इन्फोटेक सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीची स्थापना केली.

अल्पावधीतच त्यांच्या कंपनीने सॉफ्टवेअर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत विस्तार केला. मुंबई पोलिसांशी संबंधित महत्त्वाचे कामही त्यांच्या कंपनीकडे होते. ग्रामीण भागातून पुण्यासारख्या महानगरात जाऊन स्वतःच्या हिमतीवर उद्योगविश्वात स्थान निर्माण करणारा त्यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला.

पहाटेची ती बातमी अन् परिसर सुन्न

सोमवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास गौरव यांना अचानक त्रास जाणवला. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

उमेदीच्या आणि कर्तृत्वाच्या भरात असताना अवघ्या चाळिशीत त्यांचा झालेला आकस्मिक मृत्यू कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, व्यावसायिक क्षेत्रातील सहकारी आणि आश्वी परिसरातील नागरिकांसाठी मोठा धक्का ठरला आहे.

गावातून पुण्याकडे जाऊन स्वतःचे विश्व निर्माण करणाऱ्या या कर्तृत्ववान भूमिपुत्राच्या अचानक जाण्याने आश्वीच्या मातीत हळहळ व्यक्त होत आहे. एक स्वप्न पाहणारा युवा उद्योजक आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

गौरव गायकवाड यांच्या पश्चात वडील पांडुरंग गायकवाड, पत्नी, एक मुलगा, एक बहीण, मेव्हणे, चुलते श्रीरंग गायकवाड व संपत गायकवाड, बंधू अजिंक्य गायकवाड, पियुष गायकवाड, आशिष गायकवाड तसेच आश्वी खुर्द जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता गायकवाड यांच्यासह मोठा परिवार आहे.

                आज अंत्यसंस्कार

गौरव गायकवाड यांच्यावर सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आश्वी खुर्द येथील प्रवरा नदीतीरी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!