संगमनेर,(प्रतिनिधी):- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची बैठक पार पडली. जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती, शेतकरी आणि सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने लक्षात घेता जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेली आव्हाने लक्षात घेऊन सहकार क्षेत्रात अनावश्यक राजकीय संघर्ष निर्माण होऊ नये, यावर बैठकीत भर देण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची संस्था असल्याने तिचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावीपणे पुढे नेण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यापूर्वीही विविध नेतेमंडळींनी जपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापक हितासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करण्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
बैठकीस माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत ओगले, आमदार विवेक कोल्हे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अक्षय कर्डिले, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते आणि प्रतापसिंह पाचपुते आदी उपस्थित होते.
आमदार मोनिका राजळे तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभाग नोंदवत या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.बैठकीला उपस्थित राहू न शकलेल्या तसेच अद्याप संपर्क न झालेल्या नेतेमंडळींशी संवाद साधून त्यांनाही या प्रयत्नात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय आणि सामंजस्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापक हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची भूमिका जिल्हा बँक निवडणूक समितीच्या वतीने मांडण्यात आली.








