अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- अहिल्यानगर खासदारांना स्वीडन कुठे आहे, याची माहिती नसल्याने त्यांनी या विषयावर भाष्य करू नये. तसेच मागील दोन वर्षांत अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी आणता आला नाही, असा आरोप करत जिल्ह्याच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याऐवजी दुसऱ्यांच्या कौटुंबिक वादाचे राजकारण करणे ही विचारसरणी जिल्ह्यासाठी धोकादायक आहे, अशी टीका डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.
खासदारांचे काही ठरलेले डायलॉग आहेत. त्यांना स्वीडन कुठे आहे, हेही माहिती नाही. त्यामुळे त्यांनी या विषयावर भाष्य करू नये, असे डॉ. विखे पाटील म्हणाले. मागील दोन वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी आणता आला नाही. जिल्ह्यासाठी ठोस काम करता आले नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या कौटुंबिक वादात किंवा कौटुंबिक संवादात पडून त्याचे राजकारण करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय व्यक्तीचे राजकीय आणि व्यक्तिगत आयुष्य वेगळे असते. राजकीय आयुष्यात पक्ष, पक्षाच्या भूमिका तसेच आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र, व्यक्तिगत आयुष्याची एक मर्यादा असते. ती मर्यादा पाळणे आवश्यक असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत खासदारांवर विविध आरोप झाले असून महिलांशी संबंधित आरोप तसेच कॉल रेकॉर्डिंगचे विषयही समोर आले होते. मात्र, आपण कधीही या मुद्द्यांचा राजकीय फायदा घेऊन भाष्य केले नाही. खासदारांच्या व्यक्तिगत आयुष्यावर किंवा चारित्र्यावर भाष्य केलेली आपली एकही बाईट दाखवावी, असेही त्यांनी म्हटले.
व्यक्तिगत आयुष्यात कोणाच्याही जाणे योग्य नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी हा सुसंस्कृतपणा जपला आहे आणि आपणही तोच सुसंस्कृतपणा जपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
रोहित पवारांना राजकीय लक्ष्मणरेषा पाळण्याचा सल्ला
रोहित पवार यांनी माध्यमांमध्ये नेमके काय वक्तव्य केले, याची आपल्याला माहिती नसल्याचे सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांना राजकीय टीका करताना कौटुंबिक विषयांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
रोहित पवार हे सुसंस्कृत परिवारातून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. कौटुंबिक विषय माध्यमांसमोर आणण्याचे काम पवार परिवाराने कधी केले नाही आणि विखे पाटील परिवारानेही केले नाही. आमचा छोटा परिवार आहे; मात्र त्यांच्या कौटुंबिक विषयांवर आपण बोलायला सुरुवात केली तर त्यावर मोठी चर्चा होऊ शकते. परंतु आम्ही सभ्यता आणि सुसंस्कृतपणा पाळतो आणि त्यांनीही तो पाळावा, अशी अपेक्षा आहे, असे डॉ. विखे पाटील म्हणाले.
आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा; मात्र कौटुंबिक वादामध्ये पडू नका, अशी नम्र विनंती त्यांनी रोहित पवार यांना केली.
मागील पाच विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने विखे परिवाराला महाराष्ट्रातील पहिल्या पाच मताधिक्यांमध्ये स्थान दिले आहे, असेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. कोणाच्या बोलण्याने आपण मोठे किंवा लहान होणार नाही. जनसामान्यांचे कल्याण करणे हेच आपले काम असून, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी काम सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येक लोकप्रतिनिधीने महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जपण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राजकीय टीका करताना कौटुंबिक टीका होऊ नये, अशी अपेक्षा आहे. अन्यथा राजकारणात कोणतीही मर्यादा किंवा लक्ष्मणरेषा उरणार नाही आणि त्यातून गलिच्छ राजकारण निर्माण होईल. असे राजकारण महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सुसंस्कृत परंपरेला शोभणारे नाही, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.








