श्री सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरू सुजयदादा’ लक्षवेधी देखावा

अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- तोफखाना परिसरातील श्री सिद्धेश्वर बाल मंडळाच्या वतीने यंदाच्या उत्सवानिमित्त ‘विकासाचे महामेरू सुजयदादा’ हा आकर्षक आणि माहितीपूर्ण देखावा साकारण्यात आला आहे. शहरातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधांमधील झालेली वाढ तसेच पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांचा आढावा या देखाव्यातून मांडण्यात आला आहे.

या देखाव्यात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात झालेल्या विविध विकासकामांना विशेष स्थान देण्यात आले आहे. शहरातील नव्याने उभारण्यात आलेले उड्डाणपूल, सुसज्ज प्रशासकीय इमारत तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यासोबतच काँक्रीट रस्ते, नवीन उद्याने, पाणीपुरवठा व्यवस्था, शैक्षणिक सुविधा आणि नागरी विकासकामांची माहिती देणारे दिशादर्शक फलकही लक्ष वेधून घेत आहेत.

पायाभूत सुविधांसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचाही प्रयत्न या देखाव्यात करण्यात आला आहे. उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या वतीने शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘ना. राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम’ या उपक्रमाचाही देखाव्यात विशेष समावेश करण्यात आला आहे. देखाव्याच्या एका भागात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ॲड. धनंजय जाधव यांच्या छायाचित्रांसह ‘ग्रीन सिटी मोहीम’ ठळकपणे मांडण्यात आली आहे.

देखाव्याच्या तळाशी ‘समृद्ध अहिल्यानगर, विकसित महाराष्ट्र’ असा संदेश देणारा फलक लावण्यात आला आहे. विकासकामांच्या प्रतिकृती, माहितीफलक आणि आकर्षक मांडणीमुळे हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, उत्सवाच्या निमित्ताने शहराच्या विकासाचा प्रवास आणि भविष्यातील विकासाची दिशा अधोरेखित करण्याचा प्रयत्न मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!