संगमनेर,(प्रतिनिधी):- अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी – संगमनेर मतदारसंघातून श्री. रणजितसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रणजितसिंह देशमुख यांनी संगमनेर तालुका सहकारी दूध संघ (राजहंस)च्या चेअरमनपदाचा रीतसर राजीनामा दिला.
यानंतर त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीमुळे संगमनेर मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत असून, विविध मतदारसंघांतील उमेदवारी आणि राजकीय समीकरणांकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. संगमनेर मतदारसंघातून रणजितसिंह देशमुख यांच्या उमेदवारीकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








