संगमनेर,(प्रतिनिधी):- विविध प्रलंबित मागण्यांसाठी ४० दिवसांहून अधिक काळ आंदोलन करूनही सरकारकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी २८ सप्टेंबरपासून मुंबईच्या दिशेने ‘उलगुलान’ मोर्चा सुरू केला आहे. मुंबईत दाखल झालेल्या या विद्यार्थ्यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावर दडपशाही करून अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत डॉ. थोरात यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करून त्यांच्याशी संवेदनशीलतेने संवाद साधावा, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांच्या ‘उलगुलान’ मोर्चासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्या समस्या जाणून घेत, आपण विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, “आदिवासी विभागाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी या विद्यार्थ्यांनी ४० दिवसांपेक्षा अधिक काळ आंदोलन केले. मात्र, सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे न्याय मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी सुमारे १७० किलोमीटरची पायपीट करून मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतरही त्यांची दखल घेण्यात आली नाही. उलट, रात्री काँग्रेस कार्यालयात विद्यार्थी झोपले असताना मध्यरात्री त्यांना दडपशाही करून अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अत्यंत निंदनीय आहे.”
आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांमधील शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा, भोजन व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधणे हा आंदोलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सरकारकडून केवळ घोषणा करण्यात आल्या; प्रत्यक्षात आवश्यक उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोपही डॉ. थोरात यांनी केला. त्यामुळे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले.
“लोकशाहीमध्ये शांततामय आणि न्यायाच्या मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दडपशाही केली जात असेल आणि त्यांना अटक करण्याचा प्रयत्न होत असेल, तर संविधानाच्या मूल्यांवर सरकारचा विश्वास आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नाही. सरकारने तातडीने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या सर्व प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहावे,” अशी मागणी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली.








