रणजीतसिंह देशमुख जिल्हा बँकेवर संचालकपदी बिनविरोध; संगमनेर सोसायटी मतदारसंघातून विजय

संगमनेर,(प्रतिनिधी):- आशिया खंडात अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी राजहंस दूध संघाचे माजी चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांची संगमनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली आहे.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कायम मोठी मदत केली आहे. जिल्ह्यातील सेवा सोसायट्यांचे सभासद आणि शेतकरी यांचा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे बँकेचा आलेख सातत्याने उंचावत राहिला आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अनेक वर्षे बँकेचे नेतृत्व केले. त्यांच्या पाठोपाठ लोकनेते बाळासाहेब थोरात यांनीही बँकेला सक्षम नेतृत्व दिले.

यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ही बँक शेतकऱ्यांची आहे, या भूमिकेतून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची संगमनेर कारखाना कार्यस्थळावरील अमृत कुटी येथे बैठक झाली. त्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना वेग आला.

संगमनेर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून राजहंस दूध संघाचे चेअरमन आणि सहकार क्षेत्राची जाण असलेले युवा नेतृत्व रणजीतसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा आदर करत रणजीतसिंह देशमुख यांनी तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणाऱ्या राजहंस दूध संघाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला.

रणजीतसिंह देशमुख यांनी दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबविले. एमडीएफ गोठे, मुरघास संकल्पना यांचा प्रभावीपणे वापर करण्याबरोबरच नुकतेच ‘मिशन ५० लिटर’ हे अभियानही राबविण्यात आले. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य दूध महासंघाचे चेअरमनपदही भूषविले आहे. कोरोना संकटाच्या काळात राज्यातील दूध उत्पादकांना केलेली मदत विशेष उल्लेखनीय ठरली होती.

दूध संघाच्या माध्यमातून सहकार आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, सेवा सोसायटी मतदारसंघातून रणजीतसिंह देशमुख बिनविरोध निवडून आले असून, भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून संगमनेर तालुक्यातून गणपतराव सांगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

रणजीतसिंह देशमुख यांच्या बिनविरोध निवडीबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. मैथिली तांबे, बाजीराव पाटील खेमनर, पांडुरंग पाटील घुले, ॲड. माधवराव कानवडे, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे, हौशीराम सोनवणे, रामहरी कातोरे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, सौ. अर्चनाताई बालोडे, दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर तसेच सर्व संचालक मंडळ आणि विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

बँकेच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणार : रणजीतसिंह देशमुख

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श, शिस्त आणि तत्त्वांवर संगमनेरच्या सहकाराची वैभवशाली वाटचाल राहिली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाचे चेअरमनपद सांभाळताना दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले. आता जिल्हा बँकेत संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या माध्यमातून तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त मदत करण्याबरोबरच त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काम करू, असा विश्वास नवनिर्वाचित संचालक रणजीतसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!