जैविक खतांमुळे उत्पादकता वाढणार; बाळासाहेब थोरात यांचे शेतकऱ्यांना आवाहन

संगमनेर,(प्रतिनिधी):- कमी पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे पिकांवरील विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. हुमणी अळी, पायरीला, खोडकिडा आणि पांढरी माशी यांसारख्या किडींचे नियंत्रण करण्याबरोबरच जमिनीची सुपीकता आणि पीक उत्पादकता वाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर करावा, असे आवाहन राज्याचे माजी कृषिमंत्री व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), भारतीय ऊस संशोधन संस्था आणि जैविक नियंत्रण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उपयोजना कार्यक्रमांतर्गत ९५ शेतकऱ्यांना जैविक किटचे वितरण करण्यात आले. यावेळी थोरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले होते.

थोरात म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वातावरणातील बदलांचा परिणाम पिकांवरील किडींच्या वाढीवर होत असून हुमणी अळी, पायरीला, खोडकिडा आणि पांढरी माशी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत जैविक खतांचा आणि जैविक घटकांचा वापर केल्यास जमिनीतील हवा खेळती राहण्यास, सेंद्रिय कर्ब वाढण्यास आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होते. तसेच शेतीचा खर्च कमी करण्यासही हातभार लागतो.

शेणखत, ताग आणि विविध जैविक घटकांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि पीक उत्पादन वाढण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ रासायनिक निविष्ठांवर अवलंबून न राहता जैविक घटकांचा योग्य वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी डॉ. योगेश थोरात यांनी कमी पावसामुळे हुमणी अळी आणि पायरीला किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सांगितले. कीटकनाशकांवर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना जैविक नियंत्रणाच्या उपाययोजनांमुळे हा खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

सातत्याने रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास काही किडींमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याची शक्यता असते. त्यामुळे बिव्हेरिया, मेटारायझियम आणि ट्रायकोडर्मा यांसारख्या जैविक घटकांचा योग्य पद्धतीने वापर करणे उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. ज्ञानेश्वर बोरसे यांनी सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याने शेतकरी आणि ऊस उत्पादकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्यास तिची सुपीकता आणि उत्पादनक्षमता घटू शकते. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!