नगरी समाचार,(प्रतिनिधी):- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण गुरुवारी पहाटे स्थगित केले. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर सकाळी पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार सुरेश धस, आमदार प्रसाद लाड आणि बीडचे जिल्हाधिकारी यांनी पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर मराठा समाजाच्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी सरकारला तीन महिन्यांचा वेळ देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.
तीन महिन्यांच्या कालावधीत मागण्यांबाबत ठोस कार्यवाही झाली नाही, तर पुन्हा मुंबईकडे जाण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. उपोषण स्थगित केले असले तरी मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत गेलेल्या आंदोलकांनी माघारी परतावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष सुरू असल्याचे सांगत जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला आणखी तीन महिन्यांची मुदत देण्यात येत आहे. हा कालावधी संपेपर्यंत सरकारने मागण्यांवर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच सरकारकडून पुन्हा मागण्यांची पूर्तता झाली नाही तर हा कालावधी शेवटची संधी मानली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाच्या कुणबी नोंदींचा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला. आंदोलनादरम्यान ५८ लाख कुणबी नोंदी आढळून आल्याचा दावा करत या नोंदींपैकी एकही नोंद कमी होऊ नये, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. या नोंदी कमी करण्याचा प्रयत्न थांबवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात सुधारित शासन निर्णय काढण्यास सरकार तयार असल्याचा दावा त्यांनी केला.
आंदोलनाच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देताना मोठी उडी घेण्यासाठी काहीवेळा दोन पावले मागे यावे लागते, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारने संवाद साधावा आणि शिष्टमंडळ पाठवावे, यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून दबाव निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. त्यांना पाटोदा येथील विठ्ठल मंदिराच्या भक्तनिवासात सलाईन देण्यात आले होते. अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना झाल्यानंतर १२ सप्टेंबरपासून त्यांनी सलाईन घेणे बंद केले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना हात-पाय हलवणेही कठीण झाले होते. त्यामुळे आंदोलकांकडून त्यांना उपचार देण्याची मागणी केली जात होती.
सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढील तीन महिन्यांत मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत सरकारकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.









