संगमनेर,(प्रतिनिधी):- वीज आणि पाणीटंचाईच्या प्रश्नावर संगमनेर शहरात काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाला गालबोट लागले. मोर्चेकरी प्रांताधिकारी कार्यालयात दाखल झाल्यानंतर काही आंदोलकांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनातील रिकामी खुर्ची उचलून खाली फेकल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे काही काळ कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
तालुक्यातील शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, अघोषित भारनियमन बंद करावे तसेच जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्यात यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी आणि आंदोलक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. निवेदन स्वीकारण्याच्या प्रक्रियेवरून किंवा प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने काही आंदोलक संतप्त झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर काही आंदोलक कार्यालयाच्या इमारतीत दाखल झाले.
यावेळी प्रांताधिकारी कार्यालयातील दालनात घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त झालेल्या काही आंदोलकांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तसेच दालनातील प्रांताधिकाऱ्यांची रिकामी खुर्ची उचलून खाली फेकण्यात आली. या प्रकारामुळे कार्यालयातील कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तैनात पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. आंदोलकांना दालनाबाहेर काढत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला.
दरम्यान, वीजपुरवठा, भारनियमन आणि जळालेले ट्रान्सफॉर्मर या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. या घटनेमुळे संगमनेर शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांकडून पुढील कारवाईबाबत माहिती घेतली जात आहे.








