फिन्स स्विमिंगमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलचे यश

नाशिकच्या राज्यस्तरीय स्पर्धेत बायो फिन्स आणि सर्फेस स्विमिंग प्रकारात उल्लेखनीय कामगिरी

लोणी,(प्रतिनिधी):- नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय फिन्स स्विमिंग स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरा नगरच्या इयत्ता सातवीतील विद्यार्थी उमेर शेख याने उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवरील फिन्स स्विमिंग स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.

अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे सहाव्या राज्यस्तरीय फिन्स स्विमिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे ३५० जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, संभाजीनगर, अमरावती, कोकण आणि सोलापूर विभागातील जलतरणपटूंचा स्पर्धेत सहभाग होता.

प्रवरा पब्लिक स्कूलच्या उमेर शेख याने बायो फिन्स तसेच सर्फेस स्विमिंग या प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत आपले क्रीडा कौशल्य सिद्ध केले. या कामगिरीच्या जोरावर त्याची पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय फिन्स स्विमिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही विशेष महत्त्व दिले जाते. विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण तसेच आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे यांनी सांगितले.

उमेर शेख याला क्रीडा संचालक अफजल पटेल, दीपक जाधव तसेच जलतरण प्रशिक्षिका योगिता तनपुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

उमेरच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे आणि डॉ. महेश खर्डे यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!