शिर्डी,(प्रतिनिधी):- शिर्डी बसस्थानक परिसरात एसटी बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणाऱ्या पुरुष व महिला संशयितांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हस्तगत केली आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यात दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ८३०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/१५८२ दिनकर चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शिर्डी पोलिसांच्या पथकाने बसस्थानक परिसरात संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान संशयितांना तात्काळ चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांची नावे गणेश उर्फ प्रभा (काळया) अशोक लोढे (वय ३६, रा. चितळी, ता. राहाता, हल्ली रा. शनि चौक, वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) आणि मंगल नारायण गायकवाड (वय ४०, रा. चितळी, ता. राहाता, हल्ली रा. शनि चौक, वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) अशी असल्याचे समोर आले.
पोलिसांनी दोघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी दि. २० सप्टेंबर रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास शिर्डी बसस्थानकातील फलाट क्रमांक २ येथे एसटी बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोन्ही संशयितांना अटक केली.
न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे पुन्हा सखोल चौकशी केली. या चौकशीत चोरीस गेलेली सुमारे ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, डोरले व मणी असलेली शिर्डी पोलिसांनी हस्तगत केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, महादेव गुट्टे, प्रदीप बोऱ्हाडे तसेच पोहेकॉ दिनकर चव्हाण, संतोष लांडे, उदावंत, संतोष वाघ, गौतम लगड, राजेंद्र बिरदवडे, नामदेव नालेगावकर, बाबा आहेर, तुषार दवळी, विजय धनेधर, शुभम ठोकळे, मपोकॉ मनिषा पुरी, निखाडे, रोहित सूर्यवंशी, सोमनाथ जाधव यांनी परिश्रम घेतले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/१५८२ दिनकर चव्हाण करीत आहेत.








