संगमनेर,(प्रतिनिधी):- चिंचोली गुरव आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची सन १९८५ पासून प्रलंबित असलेली सिंचनाची मागणी अखेर मार्गी लागली आहे. निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळावा, यासाठी चिंचोली गुरव पंचक्रोशीतील उपसा सिंचन योजनेसाठी ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेमुळे पंचक्रोशीतील आणखी सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, चिंचोली गुरव आणि परिसरातील सुमारे ७९५ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी मिळावे, ही मागणी सन १९८५ पासून प्रलंबित होती. निळवंडे कालव्यांमधून पाणी वाहू लागल्यानंतर सुमारे ३५० हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ मिळत होता. मात्र उर्वरित क्षेत्राला पाणी मिळण्यासाठी स्वतंत्र उपसा सिंचन योजनेची आवश्यकता होती.
या पार्श्वभूमीवर स्वतंत्र प्रस्तावाच्या माध्यमातून उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात येत असून, त्यासाठी आता ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेमुळे उर्वरित सुमारे ३०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध होणार आहे. योजनेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
निळवंडे कालव्यांच्या कामाबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, दीर्घकाळ प्रलंबित असलेले कालव्यांचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष मार्गी लागले. निळवंडे धरणाच्या मुखापासून कालव्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. जिरायती भागातील कालव्यांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाणी देण्याचे काम करण्यात आले आहे.आश्वासने देण्यापेक्षा प्रत्यक्ष काम पूर्ण करून दाखविण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले.
भोजापूर पूरचारीचा ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ नदीजोड प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून या भागातील गावांच्या पाण्याच्या प्रश्नाला मोठा आधार मिळणार असून, शासनाने या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे अनेक अंदाज प्रत्यक्षात फोल ठरले असून, राज्यासमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा अस्मानी संकटाच्या काळात राजकारण करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाने पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार असून, शनिवारपर्यंत शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे आणि दिलासादायक निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पंचायत समिती स्तरावर टँकरचे वेळापत्रक गांभीर्याने तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने यापूर्वी ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आणि ४८ हजार कोटी रुपयांची वीजबिल माफी केली असून, शेतकरी बांधवांप्रती शासनाची बांधिलकी यातून स्पष्ट होते, असेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.








