ममदापूर,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील येथे गोवंशाची अवैध कत्तल करून गोमांस विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याच्या संशयावरून लोणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ११०० किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात आलेली हत्यारे आणि चारचाकी वाहन असा एकूण सुमारे ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता ममदापूर येथे काही व्यक्ती गोवंशाची कत्तल करून त्याचे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच शाहीन रोफ कुरेशी आणि कैफ रोफ कुरेशी, दोघेही रा. ममदापूर, ता. राहाता, जि. अहिल्यानगर, हे घटनास्थळावरून फरार झाले.
या कारवाईत अंदाजे २ लाख २० हजार रुपये किमतीचे ११०० किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात आलेली १ कुऱ्हाड, २ सुरी व १ कोयता, तसेच ३ लाख ५० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची चारचाकी गाडी (एमएच-४३-ए-८८४७) लोणी पोलिसांनी जप्त केली.
याप्रकरणी पोहेकॉ/१९२ सुभाष बागुल यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४८३/२०२६ अन्वये बीएनएस २०२३ चे कलम ३२५ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) मधील कलम ५, ५(अ), ५(क), ९, ९(अ), ९(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई सहाय्य पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलिसांनी केली. सदर घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल साईनाथ राशिनकर करीत आहे. फरार संशयितांचा शोध सुरू आहे.









