लोणी,(प्रतिनिधी):- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून लोणीसारख्या ग्रामीण भागात आरोग्य शिक्षणापासून ते रूग्णसेवांच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण होणे ही असामान्य गोष्ट आहे. विखे पाटील कुटुंबाच्या प्रयत्नांतून एखाद्या परिसराचा कायापालट कसा होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण असून येथील भव्य विस्तार पाहून थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली या उक्तीची प्रचिती येते. भारत वैद्यकीय पर्यटना चे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र बनू शकतो. सध्या आपण या क्षेत्रातील संधींचा पुरेसा लाभ घेत नाहीत. शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय सल्ल्यासाठी मध्य पूर्व आणि इतर अनेक देशांतून लोक येथे येत असतात. वैद्यकीय पर्यटनाच्या दृष्टीने हे एक आदर्श ठिकाण आहे असे प्रतिपादन पद्मविभूषण प्रा. मन मोहन शर्मा यांनी केले.
प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस, लोणी या अभिमत विद्यापीठाच्या २३ व्या वर्धापणदिन तसेच कॉलेज ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेसच्या नूतन ईमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजीत कार्यक्रमात पद्म विभूषण प्रो. मन मोहन शर्मा बोलत होते. यावेळी कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबईचे कुलगुरू डॉ. अनिरूध्द पंडीत, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, कृष्णा महिला उद्योग समुहाच्या संस्थापिका उत्तरा भोसले, विश्वस्त सुवर्णाताई विखे पाटील, विश्वस्त मोनिका सावंत, विश्वस्त ध्रूव विखे पाटील, कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेसच्या वतीने कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. मनमोहन शर्मा पुढे म्हणाले, विद्यापीठांनी संशोधन व कौशल्य विकासावर अधिक भर द्यावा. विविध उपक्रमांबरोबरच कौशल्य विकासावरही भर देणे गरजेचे आहे. वैद्यकीय महाविद्यालयात आपण अशी काही विशिष्ट क्षेत्रे विकसित केली पाहिजेत ज्यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण होईल, आणि आपल्या संस्थेची प्रतिष्ठा केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उंचावेल, जेणेकरून वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी जगभरातून लोक येथे येतील असे आवाहन प्रो. मन मोहन शर्मा यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यामागे फार मोठे योगदान आहे. थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली या विचारांनी प्रेरीत असलेल्या डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रेरणा व प्रयत्नांतूनच महाराष्ट्रात ईतर ठिकाणी खाजगी वैद्यकीय महाविद्यालये निर्माण झाली असल्याचे गौरवोद्गार डॉ. सुरेश भोसले यांनी काढले. प्रवरा आणि कृष्णा या दोन्ही आरोग्य संस्थांचा प्रवास तसा एकाच काळात सुरू झाला आहे. शिक्षणाची व कार्य करण्याची पध्दती एकमेकांना पुरक आहे. पद्मश्री डॉ. विठठ्लराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रवरा अभिमत विद्यापीठातर्फे जीवन गौरव पुरस्कार प्राप्त होणे ही माझ्यासाठी अतिशय सन्मानाची आणि गौरवाची बाब असल्याचे मत डॉ. भोसले यांनी व्यक्त केले.
कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित म्हणाले, आता एकट्याने संशोधन करण्याचा काळ उरलेला नाही. परस्पर सहकार्यातून आणि विविध विचारांच्या एकत्र येण्यातूनच संशोधनात भरीव कामगिरी करणे शक्य आहे. या संशोधनाचा थेट फायदा जनसामान्यांना झाला पाहिजे. यासाठी केवळ दोन संस्थांमध्येच नव्हे, तर संस्थांमधील विविध विभागांमध्येही सामंजस्य करार करून संशोधनाला गती दिली पाहिजे.
कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील म्हणाले की, गेल्या शैक्षणिक वर्षात अभिमत विद्यापीठाने अभूतपूर्व प्रगती केली आहे. मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटरच्या स्थापनेसोबतच, प्रवरा रुग्णालयाने एनएबीएच आणि एनएबीएल मानांकने प्राप्त केले आहे. आमच्या संशोधन कार्यांतूनही महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर येत असून ते अधिक समृद्ध होत आहेत.
सुरूवातीला कुलगुरू डॉ. व्ही.एन.मगरे यांनी प्रास्तविक केले. फार्मसी महाविद्यालयाच्या इमारतीची सुबक उभारणी केल्याबद्दल स्वान इन्फ्राचे संचालक स्वप्नील सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामीण दंत महाविद्यालायाच्या प्रा. डॉ. शिवानी सचदेवा यांना उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार, प्रा. शुभम कानवडे यांना बेस्ट रिसर्च पेपर पुरस्कार, श्रीमती सिंधूताई एकनाथराव विखे पाटील स्डुडंट ऑफ द ईयर (महिला) त्रिलोचना मुनोत व वृंदा पाटील, डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्टुडंट ऑफ द ईयर सिध्देश झिलपे, बेस्ट एनएसएस स्टुडंट अथर्व भटकर, स्व. श्रीमती गंगुबाई विखे पाटील ऑलराऊंड बेस्ट नर्सिंग स्टुडन्ट अनिकेत दिवे, स्व. श्रीमती द्रोपदाबाई विठ्ठलराव विखे पाटील ऑलराऊंड सेकंड बेस्ट नर्सिंग स्टुडंट अनुष्का कडू, यंग बडी रिसर्चर कनिका जैन, शिवंम वाघमारे तसेच २५ वर्षे सेवा पुर्ण केलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जीवनगौरव पुरस्काराचे वाचन डॉ. संजीव कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. दिपीका भालेराव यांनी केले. कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे यांनी आभार मानले.









