लोणी,(प्रतिनिधी):- निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या भंडारदरा आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सध्या रानफुलांचा मनमोहक पुष्पोत्सव बहरला आहे. पावसाचा जोर ओसरू लागताच हिरव्यागार डोंगररांगांवर पिवळ्याधमक सोनकीच्या फुलांची नक्षी उमटली असून संपूर्ण परिसर जणू पिवळ्या फुलांच्या गालिच्याने सजल्याचे मनोहारी दृश्य पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या या अनोख्या रंगसोहळ्यामुळे भंडारदऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली असून पर्यटकांसह निसर्गप्रेमींना या रानफुलांची भुरळ पडत आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणारा रानफुलांचा हा बहर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनुभवता येतो. या काळात सह्याद्रीच्या डोंगररांगांवर विविध प्रकारची रानफुले उमलतात. सध्या घाटघर, रतनवाडी, कळसूबाई शिखराचा पायथा तसेच डोंगरकड्यांवरील परिसर सोनकीच्या फुलांनी बहरून गेला आहे. पावसाळ्यात हिरवाईने नटलेले डोंगर आता पिवळ्या, सोनेरी रंगांच्या फुलांनी सजले असून निसर्गाने जणू सह्याद्रीच्या माथ्यावर रंगांची उधळण केली आहे.
पावसाळ्याच्या अखेरीस सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सोनकी, खुरासणी आणि विविध प्रकारच्या गवताळ रानफुलांचा बहर पाहायला मिळतो. या फुलांमुळे डोंगरउतार, पठारे आणि माळराने रंगीबेरंगी झाली आहेत. विशेषतः पिवळ्याधमक सोनकीच्या फुलांनी संपूर्ण परिसराचे रूप पालटले आहे. हिरव्यागार गवताच्या पार्श्वभूमीवर उमललेली सोनकीची फुले पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
डोंगरांच्या कुशीत, निसर्गाच्या सान्निध्यात उमललेल्या या फुलांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले भंडारदऱ्याकडे वळू लागली आहेत. निसर्गप्रेमी छायाचित्रकार आणि भटकंतीची आवड असलेले पर्यटक या फुलांच्या बहराचा आनंद घेत आहेत. फुलांनी सजलेल्या डोंगररांगांचे मनोहारी दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. भंडारदरा परिसरातील सांदण दरी ही पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण दरीचा थरार अनुभवण्यासाठी वर्षभर पर्यटक येत असतात. मात्र सध्या सांदण दरीच्या भटकंतीसोबतच रानफुलांचा बहर पाहण्याची संधी पर्यटकांना मिळत असल्याने या परिसराचे आकर्षण अधिकच वाढले आहे.
घाटघर आणि रतनवाडी परिसरातील डोंगररांगांवर उमललेल्या सोनकीच्या फुलांमुळे पर्यटकांना निसर्गाचे एक वेगळेच रूप अनुभवता येत आहे. हिरव्यागार पर्वतरांगा, डोंगरकड्यांवरील धुके आणि त्यात उमललेली पिवळीधमक रानफुले, अशा निसर्गरम्य वातावरणामुळे हा परिसर पर्यटकांसाठी छायाचित्रणाचे आकर्षक ठिकाण ठरत आहे. भंडारदरा परिसराला निसर्गपर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. पावसाळ्यापूर्वी येथे काजवा महोत्सवासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. पावसाळ्यात धबधबे, धरण परिसर आणि हिरव्यागार डोंगररांगांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतात.
आता पावसाळा ओसरल्यानंतर रानफुलांच्या बहराने भंडारदऱ्याच्या पर्यटनाला नवे आकर्षण प्राप्त झाले आहे. रानफुलांचा हा पुष्पोत्सव पर्यटकांसाठी निसर्गाचा अनोखा नजराणा ठरत असून भंडारदरा परिसरात पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक संपत्तीचे योग्य संवर्धन आणि पर्यटनाचे नियोजन केल्यास भंडारदरा परिसराला भविष्यात महाराष्ट्रातील दुसरे कास पठार म्हणून ओळख मिळू शकते.
भंडारदरा परिसरातील रानफुलांच्या या मनमोहक बहराचे सुंदर छायाचित्रण फोफसंडी टुरिझम यांनी केले आहे. या निसर्गरम्य दृश्यांचे छायाचित्रण ईटीव्ही भारतच्या प्रेषकासाठी खास उपलब्ध करून देण्यात आले आहे. सह्याद्रीच्या कुशीत उमललेल्या या रानफुलांचे सौंदर्य छायाचित्रांच्या माध्यमातून सर्वांसमोर आले असून निसर्गप्रेमींना भंडारदऱ्याच्या अनोख्या पुष्पोत्सवाची अनुभूती घेता येत आहे.









