सहकाराच्या बीजातून ग्रामीण समृद्धीचा वटवृक्ष उभा करणारा युगपुरुष – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील : सहकारातून ग्रामीण समृद्धीचा वटवृक्ष

विशेष लेख(शब्दांकन,डॉ. शांताराम चौधरी):- “एकटा माणूस कितीही कर्तृत्ववान असला, तरी परिवर्तन घडविण्यासाठी समाजाची सामूहिक शक्ती जागी झाली पाहिजे.”या विचाराला केवळ शब्दांचे रूप न देता आपल्या कार्यातून त्याची प्रचीती घडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सहकाररत्न पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील! महाराष्ट्राच्या सहकार चळवळीच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो प्रवरानगरचा सहकारी साखर कारखाना; पण त्या कारखान्याच्या धुराड्यातून केवळ साखरेचा गोडवा निर्माण झाला नाही; तर हजारो शेतकरी कुटुंबांच्या जीवनात स्वाभिमान, स्वावलंबन आणि समृद्धीची नवी पहाट उगवली.

 ब्रिटिश राजवटीच्या सावलीत, सावकारशाहीच्या मगरमिठीत आणि कर्जबाजारीपणाच्या जोखडात ग्रामीण समाजाचे जीवन अडकलेले असताना विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील असहायता पाहिली. त्या वेदनेतून त्यांच्या मनात एक प्रश्न जन्माला आला तो म्हणजे “शेतकरी कायम कर्जाच्या ओझ्याखालीच जगणार का? त्याच्या कष्टाला त्याचा योग्य मोबदला मिळणार नाही का? त्याच्या श्रमातून निर्माण होणाऱ्या संपत्तीचा मालक तो स्वतः कधी होणार?” या प्रश्नांची उत्तरे शोधताना त्यांनी सहकाराचा मार्ग स्वीकारला. आणि पुढे याच सहकाराच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला नवा चेहरा दिला.

          मातीशी नाळ जोडलेला शेतकरीपुत्र

 अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक या ग्रामीण मातीत एका शेतकरी कुटुंबात विठ्ठलरावांचा जन्म झाला. लोणी खुर्द येथील प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या जीवनाची खरी विद्यापीठे सुरू झाली. शेताची बांधं, मातीचा गंध, घामाचे थेंब आणि शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव! औपचारिक शिक्षण मर्यादित असले तरी जीवनशिक्षण मात्र अफाट होते. लहान वयातच त्यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारली. शेतकऱ्यांची परिस्थिती, सावकारांचे वाढते वर्चस्व आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेली कुटुंबे त्यांनी जवळून पाहिली. विठ्ठलरावांनी परिस्थितीला दोष देत बसण्याऐवजी तिच्यावर मात करण्याचा मार्ग शोधला. व्यवहारबुद्धी, काटकसर, नियोजन आणि परिश्रम यांच्या बळावर त्यांनी शेतीत प्रयोग केले. मात्र स्वतःची शेती सुधारली म्हणजे काम संपले, असे त्यांनी कधी मानले नाही. “माझी उन्नती आणि समाजाची अधोगती” हे समीकरण त्यांना मान्य नव्हते. त्यांची दृष्टी स्वतःच्या शेताच्या बांधापलीकडे आणि स्वतःच्या घराच्या उंबरठ्यापलीकडे होती.

• सहकाराचा पहिला अंक : पतपेढीपासून परिवर्तनाची सुरुवात

 ग्रामीण समाजाला आर्थिक आधार देण्यासाठी सहकार हा प्रभावी मार्ग ठरू शकतो, याची जाणीव विठ्ठलरावांना लवकरच झाली. १९२३ मध्ये त्यांनी ‘लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी’ची स्थापना केली. ही पतपेढी म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नव्हती; ती ग्रामीण समाजाच्या आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी होती. सावकाराच्या दारात हात जोडून उभ्या राहणाऱ्या शेतकऱ्याला संस्थेच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळू लागला. ‘एकाचा पैसा दुसऱ्याच्या उपयोगी आणि सर्वांच्या प्रयत्नातून सर्वांचा विकास’ हा सहकाराचा विचार ग्रामीण जीवनात रुजू लागला. विठ्ठलरावांनी पुढे जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे उभे केले. गावातील पाथरवट-वडार समाजातील कष्टकरी मंडळींना संघटित करून ‘मजूर सहकारी सोसायटी’ची स्थापना केली. श्रमाला प्रतिष्ठा आणि श्रमिकाला स्वाभिमान देणारी ही भूमिका त्यांच्या सामाजिक विचारांची साक्ष देणारी होती.

• शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उभा राहिलेला आवाज

 ब्रिटिश सरकारने ‘तुकडेबंदी आणि तुकडेजोड’संबंधी विधेयक आणले तेव्हा त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या जमिनीवर होणार होता. शेतजमीन ही शेतकऱ्याच्या जीवनाची केवळ उपजीविका नव्हती; ती त्याच्या अस्तित्वाची ओळख होती. या प्रश्नाचे गांभीर्य विठ्ठलरावांनी ओळखले. इस्लामपूर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने झालेल्या शेतकरी परिषदेला ते अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसह उपस्थित राहिले. हजारो शेतकऱ्यांसमोर त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आवाज दिला. पुढे पुण्याच्या कौन्सिल हॉलवर झालेल्या शेतकरी आंदोलनातही ते आघाडीवर राहिले. त्या काळात शेतकरी विखुरलेला होता; विठ्ठलरावांनी त्याला संघटनेची ताकद दाखवून दिली. त्याला आपल्या समस्येची जाणीव करून दिली आणि सामूहिक प्रयत्नांतूनच सामूहिक विकास शक्य आहे, हे पटवून दिले. याच काळात त्यांच्या नेतृत्वाला व्यापक सामाजिक आणि वैचारिक अधिष्ठान मिळाले. सत्यशोधक विचारसरणी तसेच प्रगतिशील विचारांचा त्यांच्या कार्यावर प्रभाव होता.

• साखरेच्या कारखान्यातून स्वाभिमानाची निर्मिती

 देशाला स्वातंत्र्य मिळाले. देश स्वतंत्र झाला; पण ग्रामीण भारत आर्थिकदृष्ट्या अजूनही परावलंबी होता. शेतकरी उत्पादन करीत होता; मात्र उत्पादनाची किंमत आणि त्यावर आधारित उद्योगव्यवस्था त्याच्या हातात नव्हती. विठ्ठलरावांनी या समस्येचे मूळ ओळखले. “शेतकरी ऊस पिकवतो, मग साखर उद्योगाचा मालकही शेतकरीच का नसावा?” या विचारातून एक ऐतिहासिक प्रयोग जन्माला आला. १९५० मध्ये प्रवरानगर, येथे देशातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. कै. धनंजयराव गाडगीळ आणि कै. वैकुंठभाई मेहता यांच्या मोलाच्या सहकार्याने विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर उद्योग उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. हा कारखाना उभा राहिला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या इतिहासाचे चित्रच बदलले. कारखान्याच्या भिंती उभ्या राहिल्या; पण त्याचबरोबर शेतकऱ्याच्या आत्मविश्वासाच्या भिंतीही उभ्या राहिल्या. धुराड्यातून निघणारा धूर म्हणजे केवळ उद्योगाचा धूर नव्हता; तो ग्रामीण परिवर्तनाचा ध्वज होता.

• ‘प्रवरा पॅटर्न’ : सहकाराचे विद्यापीठ

 प्रवरानगरचा सहकारी साखर कारखाना यशस्वी झाला आणि सहकाराच्या एका नव्या प्रयोगाने जन्म घेतला. ‘प्रवरा पॅटर्न!’

विठ्ठलरावांच्या दृष्टीने सहकार म्हणजे केवळ कारखाना नव्हता. सहकार म्हणजे—शेतकऱ्याला आर्थिक बळ, मुलांना शिक्षण, कुटुंबाला आरोग्य, शेताला पाणी, तरुणांना रोजगार आणि समाजाला स्वाभिमान! म्हणूनच साखर कारखान्याभोवती शिक्षणसंस्था, आरोग्यसेवा, बँकिंग व्यवस्था, सिंचन योजना आणि सामाजिक विकासाच्या अनेक योजना उभ्या राहिल्या. आज ज्याला आपण ‘समग्र ग्रामीण विकास’ म्हणतो, त्याची प्रायोगिक अंमलबजावणी विठ्ठलरावांनी त्या काळात केली होती.

• शेताच्या बांधावर उभा राहून विकासाचा विचार

 विठ्ठलराव हे कार्यालयात बसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणारे नेते नव्हते. ते प्रत्यक्ष शेतावर जात. शेतकऱ्यांशी संवाद साधत. माती हातात घेऊन तिची भाषा समजून घेत. चोपड जमिनीत चर काढल्यास पाण्याचा निचरा होईल, जमीन सुपीक बनेल आणि उत्पादन वाढेल, याचे मार्गदर्शन ते प्रत्यक्ष करीत. त्यांना माहीत होते शेतकऱ्याची आर्थिक उन्नती कागदावरच्या योजनांनी होणार नाही; ती शेतातील उत्पादन वाढल्यावरच होईल. म्हणूनच ऊस उत्पादन वाढविण्यासाठी त्यांनी उत्तम बेण्याचे महत्त्व पटवून दिले. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या उक्तीचा आधार घेत कारखान्याच्या मालकीचे सीड फार्म उभारले. दर्जेदार बेणे, सुधारित शेतीपद्धती, सिंचन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन या सर्वांचा संगम त्यांनी साधला. “प्रत्येक शेतकरी हे एक विद्यापीठ!” विठ्ठलरावांचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विलक्षण होता. “प्रत्येक शेतकरी हा स्वतःच एक विद्यापीठ बनू शकतो; गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि आवश्यक साधनसुविधांची.” हा विचार त्यांच्या कार्याची दिशा स्पष्ट करतो. शेतकरी अडाणी नाही; त्याला संधी, ज्ञान आणि साधने दिली तर तो स्वतःच्या अनुभवातून नवे ज्ञान निर्माण करू शकतो, यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांनी सहकाराला शिक्षणाशी जोडले. शेतकऱ्याच्या हातात केवळ पैसा देण्याऐवजी त्याच्या हातात ज्ञान, कौशल्य आणि निर्णयक्षमता देण्याचा प्रयत्न केला.

• प्रवरानगर : देशासाठी प्रेरणास्थान

 प्रवरानगरचा सहकारी साखर कारखाना देशभर चर्चेचा विषय बनला. १९५६ मध्ये अखिल भारतीय सहकारी साखर कारखान्यांची पहिली परिषद प्रवरानगर येथे भरविण्यात आली. देशाच्या विविध भागांतील सहकार कार्यकर्ते आणि शेतकरी या प्रयोगाचा अभ्यास करण्यासाठी प्रवरानगरला येऊ लागले. वसंतदादा पाटील, तात्यासाहेब कोरे, गणपतराव औताडे, बाबूराव तनपुरे, शंकरराव मोहिते, रत्नाप्पा कुंभार, शिवाजीराव देशमुख यांसारख्या अनेक नेत्यांना सहकारी साखर कारखानदारी उभारण्यासाठी विठ्ठलरावांनी प्रेरणा दिली. त्यामुळे प्रवरानगर हा केवळ एका कारखान्याचा परिसर राहिला नाही; तो भारतीय सहकार चळवळीचे प्रेरणास्थान बनला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १५ मे १९६१ रोजी प्रवरानगरला भेट दिली. स्वातंत्र्योत्तर भारताच्या ग्रामीण विकासासाठी सहकाराची शक्ती किती महत्त्वाची आहे, याचे प्रवरानगर हे जिवंत उदाहरण होते.

 नेहरूंनी विठ्ठलरावांच्या कार्याची प्रशंसा केली. ही भेट म्हणजे विठ्ठलरावांच्या कार्याला मिळालेली राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची पावती होती.

• सहकाराच्या पलीकडे समाजकारण

 विठ्ठलरावांचे व्यक्तिमत्त्व एका क्षेत्रात बंदिस्त नव्हते. शेतीपासून उद्योगापर्यंत, सहकारापासून शिक्षणापर्यंत आणि अर्थव्यवस्थेपासून आरोग्यापर्यंत त्यांच्या कार्याचा विस्तार होता. अल्पबचतीचे महत्त्व त्यांनी ग्रामीण जनतेला पटवून दिले. शासनाच्या अल्पबचत योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल १९६५ मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांनी त्यांचा मानपत्र देऊन गौरव केला. कुटुंबकल्याणाच्या क्षेत्रातही त्यांनी पुढाकार घेतला. १९५९ पासून त्यांनी परिसरात कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमाला चालना दिली. पुढे प्रवरा हॉस्पिटलमध्ये झालेल्या मोठ्या शिबिरातून कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदविली गेली.

• शिक्षण : परिवर्तनाचा खरा महामार्ग

 विठ्ठलरावांच्या विचारविश्वात शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. त्यांना ठाऊक होते “कारखाना एखाद्या पिढीला रोजगार देऊ शकतो; पण शिक्षण अनेक पिढ्यांचे भविष्य घडवू शकते.” कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याने ते प्रभावित झाले. कर्मवीरांना नगर जिल्ह्यात शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले आणि सर्वतोपरी सहकार्य केले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. पुढे वैद्यकीय, दंतवैद्यकीय, परिचारिका, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण, कला आणि माध्यमिक शिक्षणाच्या विविध संस्था उभ्या राहिल्या.

यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या हातात केवळ पुस्तके आली नाहीत; त्यांच्या हातात भविष्य घडविण्याची साधने आली.

• आरोग्यसेवेतून माणुसकीची जपणूक

 ग्रामीण विकासाचा पाया शिक्षणाइतकाच आरोग्यावरही अवलंबून असतो, याची विठ्ठलरावांना जाणीव होती. ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी त्यांनी १९७४ मध्ये प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना केली आणि लोणी येथे आधुनिक सुविधांनी युक्त रुग्णालय सुरू केले. आज ग्रामीण भागातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेचे जे व्यापक जाळे दिसते, त्यामागे विठ्ठलरावांच्या दूरदृष्टीची बीजे आहेत.

• सन्मान : कर्तृत्वाची राष्ट्रीय पावती

 सहकार, शेती, उद्योग, शिक्षण आणि सामाजिक विकास या विविध क्षेत्रांतील त्यांच्या असामान्य कार्याची दखल भारत सरकारने घेतली. १९६१ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब प्रदान केला. पुढे पुणे विद्यापीठाने १९७८ मध्ये ‘डी. लिट्.’ ही मानद पदवी दिली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी १९७९ मध्ये ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन त्यांच्या कृषी व ग्रामीण विकासातील योगदानाचा गौरव केला. हे सन्मान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची दाखवितात; मात्र विठ्ठलरावांच्या कार्याचा खरा सन्मान पुरस्कारांत नव्हे, तर समृद्ध झालेल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच्या हास्यात, शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्याच्या डोळ्यांतील स्वप्नात आणि स्वावलंबी झालेल्या कुटुंबाच्या जीवनात दिसून येतो.

• विचारांचा वारसा : आजही तेवणारी प्रेरणाज्योत

 पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हे एका काळाचे प्रतिनिधी नव्हते; ते काळाच्या पुढे पाहणारे द्रष्टे होते. त्यांनी सहकाराला अर्थकारणाची चौकट न मानता सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन बनविले. त्यांनी शेतकऱ्याला दयेचा विषय बनविला नाही; त्याला विकासाचा भागीदार बनविले. त्यांनी ग्रामीण समाजाला केवळ मदत केली नाही; त्याला स्वावलंबनाची दिशा दिली.

 त्यांनी कारखाना उभारला; पण त्याबरोबर शिक्षणसंस्था उभारल्या. त्यांनी शेतीचा विकास केला; पण त्याबरोबर सिंचनव्यवस्था निर्माण केली. त्यांनी आरोग्यसेवा उभी केली; पण त्याबरोबर वैद्यकीय शिक्षणालाही चालना दिली. हीच त्यांच्या कार्याची वैशिष्ट्यपूर्ण व्यापकता होती.

 एका छोट्याशा ग्रामीण गावातून सुरू झालेला हा प्रवास प्रवरानगरच्या सहकारी साखर कारखान्यापर्यंत पोहोचला आणि तेथून संपूर्ण महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला दिशा देत देशभर पसरला. विठ्ठलराव विखे पाटील यांनी साखर कारखाना उभारला नाही; त्यांनी माणसांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करणारी व्यवस्था उभारली. त्यांनी सहकाराची बीजे रोवली; त्या बियातून उद्योगाचा वृक्ष उगवला. त्या वृक्षाला शिक्षणाची पालवी फुटली, आरोग्याची फुले आली आणि ग्रामीण समृद्धीची फळे लागली.

म्हणूनच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरण म्हणजे केवळ एका महान व्यक्तीचे स्मरण नव्हे; ते सहकाराच्या सामूहिक शक्तीचे, शेतकऱ्याच्या स्वाभिमानाचे आणि ग्रामीण भारताच्या परिवर्तनक्षमतेचे स्मरण आहे.

 आज सहकार क्षेत्र नव्या आव्हानांना सामोरे जात असताना विठ्ठलरावांचा विचार अधिकच महत्त्वाचा ठरतो. कारण काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते, अर्थव्यवस्थेची रूपे बदलतात; पण एकजुटीने उभे राहून सामूहिक हितासाठी काम करण्याची सहकाराची शक्ती कधीच कालबाह्य होत नाही. त्यांच्या कार्याचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. “सहकारातून स्वावलंबन, स्वावलंबनातून सामर्थ्य आणि सामर्थ्यातून समृद्धी!”

 अशा या सहकाराच्या महामेरूला, ग्रामीण परिवर्तनाच्या द्रष्ट्या शिल्पकाराला आणि शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या युगपुरुषाला मनःपूर्वक अभिवादन! 

 

Leave a Comment

error: Content is protected !!