नगरी समाचार,(प्रतिनिधी):- हनुमंतगाव परिसरातील नदीकाठच्या शेतात कपाशी पिकावर औषध फवारणी करत असताना बिबट्याने शेतकऱ्यावर अचानक झडप घातल्याची धक्कादायक घटना सोनगाव परिसरात घडली. मच्छिंद्र भाऊसाहेब जेजुरकर हे फवारणी करत असताना जवळच्या उसातून अचानक बिबट्या बाहेर आला आणि त्याने त्यांच्यावर हल्ला केला. जेजुरकर यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारील शेतकरी मदतीला धावून आल्याने बिबट्याला हुसकावून लावण्यात यश आले आणि त्यांचा जीव थोडक्यात बचावला.
जेजुरकर यांच्या आरडाओरडीचा आवाज ऐकून नाना जेजुरकर आणि संदीप दिघे यांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरडाओरड करून बिबट्याला पळवून लावले. त्यानंतर बिबट्या उसाच्या दिशेने पसार झाला.
दरम्यान, या परिसरात बिबट्याची मादी आणि तिची पिल्ले असल्याची माहिती ग्रामस्थांनी यापूर्वी वनविभागाला दिल्याचा दावा केला आहे. मात्र, वारंवार सूचना करूनही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बिबट्याने आता थेट शेतकऱ्यावर हल्ला केल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
बिबट्याच्या दहशतीचा परिणाम शेतीच्या कामांवरही झाला आहे. भीतीमुळे मजूर शेतात जाण्यास धजावत नसल्याने कपाशी व इतर पिकांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. नदीकाठ, ऊस क्षेत्र आणि शेतालगतच्या परिसरात वनपथकाची गस्त वाढवावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
बिबट्याचा वाढता वावर आणि शेतकऱ्यावर झालेला हल्ला पाहता, वनविभाग आता ठोस कारवाई करणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









