पाथरे-कोल्हार रोडवर दरोड्याचा डाव उधळला; एकाला अटक

लोणी पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत एक जेरबंद, चौघे फरार

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- पाथरे-कोल्हार रोडवरील जगदंबा माता मंदिराजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीवर लोणी पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच चौघे जण दोन मोटारसायकलींवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले, तर एकाला पोलिसांनी हत्यारांसह ताब्यात घेतले.

२६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता पाथरे शिवारातील निर्जन ठिकाणी काही संशयित व्यक्ती दरोडा टाकण्याच्या तयारीत एकत्र जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर लोणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.

या कारवाईत नितीन उर्फ चिनीबाळा जानु भिंगारदिवे (वय २६, रा. पंचवटी झोपडपट्टी, राहाता) हा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्यासोबत असलेले अनिकेत उर्फ मयूर विठ्ठल आल्हाट, सनी मच्छिंद्र नरोडे, रोहित साळवे आणि सनी नरोडे याचा नाव-पत्ता माहीत नसलेला मित्र हे चौघे पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले.

पोलिसांनी घटनास्थळावरून दरोड्यासाठी वापरता येणारे साहित्य जप्त केले. यामध्ये सुमारे दोन फूट लांबीचा धारदार कोयता, साडेसहा इंच पात्याचा चाकू, अडीच फूट लांबीचा लाकडी दांडा, सुमारे २० फूट लांबीचा दोरखंड आणि मिरची पावडरचे पाकीट यांचा समावेश आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पोपट भोईटे यांनी फिर्याद दिली. लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), ३१० (५) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी तसेच बाबासाहेब सांगळे, पोलीस हे.कॉ. सूर्यभान पवार, पो.कॉ. विनोद कुदनर यांनी केली.

Leave a Comment

error: Content is protected !!