राहाता,(प्रतिनिधी):- संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील पत्रकार सोमनाथ डोळे यांना त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘पत्रकार भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मातोश्री कै. बबाबाई मारुती घुगे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांना फराळ वाटप तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘समाजरत्न’ पुरस्कार आणि पत्रकारांना ‘पत्रकार भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या सोहळ्यात सोमनाथ डोळे यांची पत्रकार भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नाशिक येथील स्वामी विवेकानंद नगर, सिडको परिसरातील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते सोमनाथ डोळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सोमनाथ डोळे हे शेतकरी कुटुंबातील असून, संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे त्यांचे वास्तव्य आहे. विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील सामाजिक प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सातत्याने मांडल्या आहेत. ग्रामीण भागातील प्रश्नांना पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा यमुना घुगे आणि बी. के. नागरे यांनी केले आहे. या उपक्रमासाठी भोजराज गिते, डॉ. उल्हास कुटे, कांती केदारे, सुनील दगडू, आप्पा घुगे, रोहिदास आळ्हाड आणि मारुती इलग यांचे सहकार्य लाभत आहे.
सोमनाथ डोळे यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल झरेकाठी परिसरासह संगमनेर तालुक्यातील पत्रकार, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.








