संगमनेरमध्ये ५ कोटींची स्वच्छता वाहने दाखल; बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लोकार्पण

संगमनेर, (प्रतिनिधी):- विकसित आणि वैभवशाली शहर म्हणून ओळख असलेल्या संगमनेरला अधिक स्वच्छ, सुंदर आणि धुळमुक्त बनविण्याच्या दिशेने नगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या वाहनांमुळे आदर्श स्वच्छ व सुंदर संगमनेरची संकल्पना पूर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन थोरात यांनी केले.

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेच्या वतीने ‘एक पणती स्वच्छतेची’ या उपक्रमांतर्गत यशोधन कार्यालय येथे हा लोकार्पण सोहळा पार पडला. यामध्ये दोन अत्याधुनिक स्वीपिंग मशीन, दहा नवीन घंटागाड्या, पाच जुन्या घंटागाड्यांचे नूतनीकरण, चार ट्रॅक्टर आणि दोन अन्य वाहनांचा समावेश आहे. सुमारे पाच कोटी रुपये खर्चून ही वाहने नगरपालिकेच्या सेवेत दाखल करण्यात आली आहेत.

यावेळी आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, डॉ. संजय मालपाणी, दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, कैलास लोणारी, अरुण वाकचौरे, सभापती किशोर टोकसे यांच्यासह नगरसेवक, विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

निधी कसा आणायचा हे आम्हाला माहिती; विरोधकांच्या बुद्धीची कीव येते – आमदार सत्यजित तांबे

संगमनेर शहर धुळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या सहकार्याने राज्यातून केवळ संगमनेर नगरपालिकेला अडीच कोटी रुपयांचे स्वीपिंग मशीन उपलब्ध झाले आहे. या मशीनसाठी निधी कसा मिळाला, याची माहितीही विरोधकांना नाही. मशीन दाखल झाल्यानंतर विरोधक जागे झाले आहेत. आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो. केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी पसरविणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते. निधी कसा आणायचा आणि चांगली विकासकामे कशी करायची, हे आम्हाला चांगले ठाऊक आहे, अशा शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळापासून संगमनेर नगरपालिकेने आदर्शवत कामाची परंपरा निर्माण केली आहे. त्यानंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी ही परंपरा पुढे नेली. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात स्वच्छतेच्या क्षेत्रात मोठे काम झाले. यामुळे संगमनेर नगरपालिकेला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले.

शहरामध्ये स्वच्छता आणि शिस्तीची संस्कृती निर्माण झाली असून, नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक वाहनांमुळे स्वच्छ आणि धुळमुक्त संगमनेरच्या दिशेने आणखी प्रभावी काम करता येणार आहे. शहरात नागरिकांना मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. सार्वजनिक स्वच्छता ही केवळ नगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, मागील नऊ महिन्यांपासून स्वच्छता अभियानांतर्गत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘एक पणती स्वच्छतेची’ या उपक्रमातून दोन अत्याधुनिक स्वीपिंग मशीन उपलब्ध झाली आहेत. मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांच्या सहकार्यातून राज्यात प्रथमच संगमनेर नगरपालिकेला अडीच कोटी रुपयांची स्वीपिंग मशीन उपलब्ध झाली आहे. या मशीनच्या देखभाल आणि संचालनाची पुढील पाच वर्षांची जबाबदारी सरकारकडे असणार आहे.

स्वच्छतेच्या कामासाठी नव्याने कोणार्क कंपनीला ठेका देण्यात आला आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी पाहिलेले स्वच्छ आणि सुंदर संगमनेरचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहराच्या विकासासाठी विविध माध्यमांतून निधी उपलब्ध करून आणला जात आहे. नवीन भाजी मार्केट सुरू झाले असून, नऊ ठिकाणी फूड कोर्ट उभारण्यात आले आहेत. आगामी काळात शून्य टक्के कचरा निर्मिती आणि सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीजबिल शून्यावर आणण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले की, नवीन स्वीपिंग मशीनच्या माध्यमातून एका दिवसात सुमारे ४० किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता करता येणार आहे. त्यामुळे संगमनेर शहराच्या स्वच्छतेला अधिक गती मिळेल. या अभियानात विद्यार्थ्यांनीही स्वच्छता दूत म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर आणि गार्डन सिटी हे स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सवय नागरिकांमध्ये रुजविण्यात आली. या कामामुळे केंद्र आणि राज्य सरकारचे अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रपतींकडून दहा कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले असून, अमिताभ बच्चन यांच्या हस्तेही सन्मान झाला आहे. शहरात नव्याने ३७ उद्याने विकसित करण्यात आली असून, या कामात सफाई कर्मचारी आणि नागरिकांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

 

error: Content is protected !!