रस्ता विचारला अन् मंगळसूत्र हिसकावले

संगमनेर,प्रतिनिधी (सोमनाथ डोळे):- संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर शिवारात रस्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला लक्ष्य केले. साकूरकडे जाणारा रस्ता विचारण्याच्या निमित्ताने जवळ आलेल्या चोरट्यांनी ७० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

ही घटना कौठे मलकापूर शिवारातील निसर्ग हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या फॉरेस्ट परिसरातील रस्त्यावर घडली. याप्रकरणी वच्छलाबाई तबाजी ढेंबरे (वय ७०, रा. अंजनीगडवस्ती, बिरेवाडी, साकूर, ता. संगमनेर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, वच्छलाबाई या पती तबाजी ढेंबरे यांच्यासोबत शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) खरशिंदे येथे मुलगी कमल संजय वाडेकर यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेथे मुक्काम केल्यानंतर शनिवारी सकाळी त्या दुसऱ्या मुलीच्या चौधरवाडी, वरवंडी येथील घरी गेल्या. जेवण आटोपून सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पती-पत्नी इलेक्ट्रिक स्कुटीवरून साकूर येथील आपल्या घरी परतत होते.

दरम्यान, कौठे मलकापूर शिवारातील निसर्ग हॉटेलच्या पाठीमागील फॉरेस्ट परिसरात पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी तबाजी ढेंबरे यांना साकूरकडे जाणाऱ्या रस्त्याची विचारणा केली. दाम्पत्याने रस्ता सांगितल्यानंतर हे दोघे स्कुटीजवळून पुढे जाऊ लागले. मात्र, काही क्षणांतच मागे बसलेल्या चोरट्याने अचानक वच्छलाबाई यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र हिसकावले.

अचानक घडलेल्या या प्रकाराला वच्छलाबाईंनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, झटापटीत त्यांची स्कुटी रस्त्यावर पडली. याच संधीचा फायदा घेत दोन्ही चोरटे मोटारसायकलवरून साकूरच्या दिशेने पसार झाले. चोरीस गेलेल्या मंगळसूत्राचे वजन सुमारे दीड तोळे असून त्याची किंमत ९० हजार रुपये असल्याचे सांगितले.

फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार, दोन्ही संशयित सडपातळ बांध्याचे आहेत. त्यापैकी मागे बसलेल्या इसमाचा रंग गोरा असून त्याने काळ्या रंगाचे जर्किन परिधान केले होते. घटनेनंतर वृद्ध दाम्पत्य घरी परतले. त्यानंतर मुलगा अण्णासाहेब ढेंबरे याला घटनेची माहिती दिली. त्याने आईला पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली.

भरदिवसा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध दाम्पत्याला लक्ष्य करून मंगळसूत्र चोरी केल्याच्या या घटनेमुळे कौठे मलकापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरून येणाऱ्या अनोळखी व्यक्तींकडून अशा प्रकारे फसवणूक व चोरी होण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन्ही संशयितांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

error: Content is protected !!