झरेकाठी,प्रतिनिधी (सोमनाथ डोळे):- राहता तालुक्यातील तिसगाव-लोहेगाव शिवरस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील विहिरीवर बिबट्या बसलेला दिसून आला. यावेळी नकुल विलासराव कडू यांनी प्रसंगावधान राखत मजुरांना सावध केल्याने संभाव्य दुर्घटना टळली.

तिसगाव येथील नकुल कडू या परिसरातून जात असताना त्यांना विहिरीवर बिबट्या बसलेला दिसला. त्याचवेळी दिवसभर शेतात काम करून अनेक शेतमजूर, कामगार आणि शेतकरी घराकडे परतत होते. बिबट्या रस्त्यालगतच असल्याने या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नकुल कडू यांनी मोठ्याने आरडाओरडा करून मजुरांना सावध केले. त्यांच्या सतर्कतेमुळे मजूर आणि शेतकरी वेळीच सावध झाले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा दुर्घटना घडली नाही.
दरम्यान, तिसगाव-लोहेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतात काम करण्यासाठी जाणारे शेतकरी तसेच सायंकाळच्या वेळी घरी परतणाऱ्या शेतमजुरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः अंधार पडल्यानंतर शेतरस्त्यांवरून ये-जा करणे धोकादायक ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठिकाणी तातडीने पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नकुल विलासराव कडू यांनी वन विभागाकडे केली आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.








