लोणी बु. ग्रामपंचायतीला विभागीय प्रथम पुरस्कार

नगरी समाचार,(प्रतिनिधी):-  संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात विभागीय पातळीवरील प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत लोणी बु.ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांना जाहीर झाला आहे. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथील विकास योजना शाखा यांच्यातर्फे सन २०२५-२६ अंतर्गत विभागस्तरावर राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ‘राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे’ निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींच्या तपासणीनंतर नाशिक विभागातील विजेत्या ग्रामपंचायतींची नावे घोषित करण्यात आली आहेत. शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी बु. ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल ग्रामपंचायतीला विभाग स्तरावरील प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

नाशिक विभागात द्वितीय पुरस्कार ,ग्रामपंचायत वाठोडे, ता. शिरपूर, जि. धुळे आणि तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत भोकणी, ता. सिन्नर, जि. नाशिक यांना जाहीर झाले आहेत.अप्पर आयुक्त (विकास) तथा प्राधिकृत अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक कार्यालयाने हे पुरस्कार जाहीर केले असून पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!