अमेरिकेतील साईभक्तांकडून श्री साईबाबांच्या चरणी चांदीची छत्री अर्पण

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- श्री गणेश चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर अमेरिकास्थित साईभक्त के. चंद्रशेखर यांनी श्री साईबाबांच्या चरणी भक्तिभावाने सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची छत्री अर्पण केली.अर्पण करण्यात आलेल्या या छत्रीचे वजन ८ किलो ९३३ ग्रॅम असून, तिचे देणगी मूल्य १८ लाख ८४ हजार ८६३ रुपये इतके आहे.

साईभक्त के. चंद्रशेखर यांनी अर्पण केलेली ही छत्री श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीवर माध्यान्ह आरतीपूर्वी विधिवत प्रतिष्ठापित करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

छत्री अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्त के. चंद्रशेखर यांचा सत्कार करून त्यांच्या भक्तीभावाचे कौतुक केले.अमेरिकेत वास्तव्यास असूनही शिर्डीच्या साईबाबांप्रती असलेली श्रद्धा जपत त्यांनी केलेल्या या अर्पणामुळे साईभक्तीचा भाव पुन्हा अधोरेखित झाला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!