नगरी समाचार,(प्रतिनिधी):- शिर्डीत हरितालिका पूजा आणि गणेश स्थापनेच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये पूजासाहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. मात्र, शिर्डीच्या बाजारपेठेत पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या बदामाच्या नावाखाली चक्क प्लास्टिकचे बदाम विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात होता.
पाच फळे देवापुढे ठेवण्याच्या प्रथेत बदामाला समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हरितालिका आणि गणेशोत्सवाच्या काळात पूजेसाठी बदामाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, याच श्रद्धेचा गैरफायदा घेत पूजासाहित्यात प्लास्टिकचे बदाम विक्रीसाठी आणण्यात आल्याचा समोर आला.
या प्रकरणाची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून कारवाई करण्यात आली. शिर्डीतील चार किरकोळ विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या दुकानातील प्लास्टिकचे बदाम आणि संबंधित बनावट माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता, या प्लास्टिकच्या बदामांचा पुरवठा नेमका कुठून झाला? याचा शोध घेण्याचे आदेश त्यांनी दिले.
संगमनेर येथील प्लास्टिक बदामाच्या होलसेल विक्रेत्याचा शोध घेऊन त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. त्यामुळे या प्रकरणामागील संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास होण्याची दाट शक्यता आहे.
पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये अशा प्रकारे बनावट अथवा प्लास्टिकच्या वस्तूंची विक्री होत असल्याने भाविकांच्या श्रद्धेचा आणि ग्राहकांच्या विश्वासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पूजासाहित्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून अशा वस्तूंची विक्री केली जात नाही ना, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
आता या प्रकरणातील प्लास्टिक बदामांचा संगमनेरमधील मुख्य पुरवठादार कोण? हा माल शिर्डीत नेमका कुठून आला आणि आणखी किती ठिकाणी त्याची विक्री झाली? याचा तपास केला जाणार आहे.









