Crime News l ममदापूरमध्ये गोवंशाची कत्तल; ४.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे फरार

नगर समाचार,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील ममदापूर गावात गोवंशाची अवैध कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोणी पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी कत्तल केलेले अंदाजे ६०० किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात आलेली हत्यारे आणि होंडा कंपनीची चारचाकी गाडी असा एकूण सुमारे ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी असलेले दोघे अंधाराचा फायदा घेत काटवनातून पसार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ममदापूर येथील रेहान महम्मद आयाज कुरेशी याच्या घरासमोरील रस्त्याच्या पलीकडे काटवनात गोवंशाची कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर लोणी पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी जाण्याची तयारी केली.

पोलिस पथक रात्री ११.४४ वाजता लोणी पोलीस ठाण्यातून निघाले. १६ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ममदापूर येथे पोहोचल्यानंतर पायी घटनास्थळी जाऊन सुमारे १२.३० वाजता छापा टाकण्यात आला. त्यावेळी दोन इसम कत्तल करताना दिसून आले. मात्र, पोलिस आणि पंचांची चाहूल लागताच रेहान महम्मद आयाज कुरेशी आणि मुद्दसर कुरेशी, दोघेही रा. ममदापूर, ता. राहाता, हे अंधाराचा फायदा घेत काटवनातून पसार झाले.

घटनास्थळाची पंचांसमक्ष पाहणी केली असता तेथे गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले गोमांस, मांस कापण्यासाठी वापरण्यात आलेली एक कुऱ्हाड, दोन सुरे आणि एक कोयता, तसेच MH-43-A-8847 क्रमांकाची होंडा कंपनीची चारचाकी गाडी आढळून आली.

पोलिसांनी अंदाजे ६०० किलो गोमांसाची किंमत १ लाख २० हजार रुपये, चारचाकी वाहनाची किंमत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये, तर कत्तलीचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. गोमांस नाशवंत असल्याने पंचांसमक्ष त्याचे नमुने डीएनए तपासणीसाठी घेण्यात आले. हे नमुने जाड मिठामध्ये प्लास्टिकच्या बरणीत ठेवून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच सील केले. उर्वरित गोमांस पंचांसमक्ष जमिनीत पुरून नष्ट करण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी रेहान महम्मद आयाज कुरेशी आणि मुद्दसर कुरेशी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३२५ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, ASI सूर्यभान पवार , पोलीस कॉन्स्टेबल पोपट भोईटे, साईनाथ राशिनकर, आणि होमगार्ड यांनी केली.पुढील तपास अविनाश मकासारे करीत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!