नगरी समाचार,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ब्राम्हणे वस्ती परिसरात नागेश शंकर लोट (वय ३८) यांच्यावर तलवार, चाकू आणि लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी सागर कांतीलाल उल्हारे (वय २७, रा. प्रसादनगर, राहुरी कारखाना) आणि विठ्ठल उर्फ बंटी माणिक गर्जे (वय २४, रा. साखर कारखाना कामगार वसाहत, राहुरी) या दोघांना अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला विकी राक्षे यालाही स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सापळा रचून ताब्यात लोणी पोलिसांकडे स्वाधीन केले.
५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.१० वाजता नागेश लोट हे ड्युटी संपवून घरी जात असताना पी. व्ही. पी. कॉलेजजवळील ब्राम्हणे वस्ती परिसरातील सिमेंटच्या रस्त्यावर दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार ते पाच जणांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर हल्लेखोरांनी चाकू, तलवार आणि लोखंडी पाईपने नागेश लोट यांच्या हातावर, पाठीवर आणि डोक्यावर मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे उपचार सुरू होते.या घटनेप्रकरणी नागेश यांचे भाऊ नविन शंकर लोट यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४५१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात होता.
उपचारादरम्यान ७ सप्टेंबर रोजी नागेश लोट यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात हल्ल्यामागील कारणाबाबत माहिती दिली. त्यांच्या जबाबानुसार, लोणी खुर्द येथील विकी राक्षे हा त्याच्या पुतणीला त्रास देऊन धमकावत होता. त्यामुळे नागेश यांनी पुतणीचे सिमकार्ड काढून घेतले आणि तिला पुणे येथे नातेवाईकांकडे पाठवले. याच कारणाचा राग मनात धरून विकी राक्षे याने आपल्यावर हल्ला घडवून आणल्याचा आरोप नागेश लोट याने केला होता.
पोलिसांच्या तांत्रिक तपासात विकी राक्षे आणि सागर उल्हारे हे घटनेच्या दिवशी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर सागर उल्हारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने विकी राक्षेच्या सांगण्यावरून नागेश लोट यांच्यावर हल्ला केल्याची माहिती दिली. तसेच हल्ल्यावेळी सागर उल्हारे आणि विठ्ठल उर्फ बंटी गर्जे हे देखील सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या विकी राक्षे याचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. विकी राक्षे कडून हल्ल्याचा कट नेमका कोठे रचण्यात आला, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे कोठून आणली तसेच त्याच्या इतर साथीदारांचा तपास लोणी पोलिस करत आहे.









