प्रवरा महिला औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चिंचोली, सिन्नर येथील प्रवरा महिला औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन उपक्रमाचे आयोजन केले.

महाविद्यालयीन सामाजिक बांधिलकी अंतर्गत वनप्रस्थ फाउंडेशन, सिन्नर यांच्या सहकार्याने आई तुळजाभवानी डोंगर परिसरात हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण केले.

वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत विकास याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असून, भावी पिढ्यांसाठी हरित व शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमातून “वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवला.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. चारुशीला भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रम समन्वयिका डॉ. कावेरी वडितके आणि शीतल गोसावी यांनी आयोजन व यशस्वी अंमलबजावणीसाठी सक्रिय सहभाग घेतला.

Leave a Comment

error: Content is protected !!