नगरी समाचार,(प्रतिनिधी):- महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, संतपरंपरा आणि महापुरुषांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवतानाच सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारा प्रवरा सांस्कृतिक महोत्सव पाथरे बुद्रुक येथे उत्साहात संपन्न झाला. रिमझिम पावसाची बरसात सुरू असतानाही विद्यार्थ्यांचा उत्साह आणि रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसर सांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाला.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवानिमित्त प्रवरा सांस्कृतिक महोत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाला संस्कृती व परंपरेचा आधार देण्यात आला आहे.

पाथरे बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात पंचक्रोशीतील १९ शाळांमधील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा, संत तुकाराम महाराजांचे चरित्र, समूहगीते, लोककला, सण-उत्सव, वारी तसेच विविध सामाजिक विषयांवरील सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली.

‘अंगात आले देव, अकरा रुपये पुढे ठेव’ यांसारख्या सादरीकरणातून अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्यात आली. तसेच व्यसनमुक्तीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेल्या या व्यासपीठातून मनोरंजनासोबतच संस्कृती, इतिहास आणि सामाजिक जाणीवेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
यावेळी डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या, “शैक्षणिक कार्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि खेळाला वाव मिळावा, या उद्देशाने मागील अनेक वर्षांपासून प्रवरा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होण्याबरोबरच महापुरुषांच्या चरित्राची ओळख होते. प्रवरेच्या शाळांबरोबरच परिसरातील शाळांनाही आपले कलागुण सादर करण्यासाठी या माध्यमातून व्यासपीठ मिळते.”
यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक आबासाहेब घोलप, बाळकृष्ण चोरमुंगे, रमेश पन्हाळे, पाथरेचे सरपंच उमेश घोलप, सुभाष अंञे, अशोक घोलप, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, पाथरे महाविद्यालयाचे प्राचार्य कोंडीबा बारगुजे यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









