नगरी समाचार,(प्रतिनिधी):-टाकळीभान शिवारात १० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या रस्ता अपघातात नवनाथ उर्फ राहुल प्रकाश जाधव यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि वेळबद्ध तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना देण्यात आले
शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) विनोद साळवे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष दीपक कांबळे, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार यांच्यासह विशाल जगताप, ज्ञानेश्वर आव्हाड, समर्थ जावने, मनोज गायकवाड, किरण गायकवाड, आकाश जाधव, प्रमोद जंजाळे, मालन जाधव, राजू कांबळे, सोमनाथ मगरे, उत्तम कांबळे आदी उपस्थित होते.
निवेदनानुसार, १० एप्रिल रोजी टाकळीभान शिवारातील आर्या पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात राहुल जाधव यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाचा भाऊ आकाश प्रकाश जाधव यांनी १५ एप्रिल रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अपघातात स्कोडा कार क्रमांक MH 12 LJ 9247 सहभागी असल्याचा त्यांचा दावा आहे. हे वाहन दत्तात्रय दळे चालवत असल्याचे कुटुंबीयांना समजल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या दाव्यांची उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सखोल पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाच महिन्यांनंतरही तपासाबाबत कुटुंबीय असमाधानी
घटनेला जवळपास पाच महिने उलटूनही तपासात समाधानकारक प्रगती झालेली नसल्याची तक्रार मृतकाच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेली कार्यवाही, तपासाची सद्यस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपासाची दिशा याबाबत कुटुंबीयांना लेखी माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात तपासावर दबाव किंवा हस्तक्षेप होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वाहनचालकाच्या पत्नी श्रीरामपूर येथे सरकारी वकील म्हणून कार्यरत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे असून, त्यांच्या पदाचा किंवा शासकीय संबंधांचा वापर तपासावर प्रभाव टाकण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून त्यातील तथ्य तपासावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
CCTV, तांत्रिक व इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासण्याची मागणी
अपघाताचा तपास करताना घटनास्थळ आणि परिसरातील CCTV फुटेज तपासावे, घटनास्थळाचा पंचनामा, वाहनांचे तांत्रिक परीक्षण, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर उपलब्ध पुरावे संकलित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे, वाहनाच्या नुकसानीचा अहवाल, वैद्यकीय अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल यांचीही सखोल पडताळणी करावी. उपलब्ध सर्व पुराव्यांची परस्पर पडताळणी करून अपघाताची नेमकी परिस्थिती आणि जबाबदारी निश्चित करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
तपासादरम्यान कोणत्याही व्यक्तीकडून दबाव, हस्तक्षेप किंवा आरोपीला मदत केल्याचे पुराव्यांवरून सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आला.
कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा
राहुल जाधव यांच्या मृत्यू प्रकरणात उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिवसेना सामाजिक न्याय विभागाने केली आहे.
प्रशासनाने मागण्यांवर तातडीने कार्यवाही केली नाही आणि निष्पक्ष तपास करून दोषींवर कारवाई झाली नाही, तर विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला









