लोणी,(प्रतिनिधी):- प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटी सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचा प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत असून, आर्थिक शिस्तीचे पालन करताना संचालक मंडळाने सेवकांच्या सर्वांगीण हिताला प्राधान्य दिले आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी काढले.
लोणी येथे प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटी सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा विद्यादेवी घोरपडे होत्या. यावेळी शिक्षण संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारत घोगरे, शिक्षण संचालिका लिलावती सरोदे यांच्यासह संस्थेचे संचालक व सभासद उपस्थित होते.
शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, सेवकांच्या पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. सभासदांना कर्जाची सुविधा उपलब्ध करून देतानाच त्याची शाश्वत परतफेड होणेही महत्त्वाचे आहे. राज्यातील काही पतसंस्था आर्थिक अडचणीत आलेल्या असताना प्रवरा सेवक पतसंस्थेने स्थापनेपासून आर्थिक सक्षमतेची वाटचाल कायम ठेवली आहे.
महिला जबाबदारी सांभाळताना काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करतात. अध्यक्षा विद्यादेवी घोरपडे यांनीही याच पद्धतीने संस्थेचा कारभार पुढे नेला आहे. संचालक मंडळानेही उत्तम कारभार करताना केवळ कर्जवाटपावर भर न देता सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. सभासदांच्या मुलींच्या विवाहासाठी कन्यादान योजना, तसेच मयत सभासदांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यासारख्या योजनांमधून संस्थेची सभासदांप्रती असलेली बांधिलकी दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा विद्यादेवी घोरपडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संस्थेच्या वाटचालीचा आढावा देताना त्यांनी सांगितले की, संस्थेचे सध्या ५९६ सभासद असून, संस्थेचे भागभांडवल २० कोटी रुपये आहे. संस्था स्वभांडवली असून सभासदांना १० टक्के लाभांश दिला जाणार आहे.









