शिर्डीत जबरी चोरी; चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला बेड्या

शिर्डी,(प्रतिनिधी):- शिर्डी शहर व परिसरात जबरी चोरी, दुचाकी चोरी तसेच नागरिक आणि भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ५ गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, आरोपींकडून तब्बल ३ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चेन स्नॅचिंग, जबरी चोरी आणि मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी हे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तपास सुरू केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात पोलिसांचा रूट मार्च सुरू असताना तपास पथकाला संशयित आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता शिर्डी परिसरात घडलेल्या चेन स्नॅचिंग, जबरी चोरी आणि दुचाकी चोरीच्या एकूण पाच गुन्ह्यांची माहिती समोर आली.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या दुचाकी तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या कारवाईमुळे शिर्डी शहर व परिसरातील चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाला मोठी चालना मिळाली आहे. गणेशोत्सव तसेच शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!