गाडगेबाबा सेवा प्रतिष्ठानकडून मुळेकर कुटुंबाला मदतीचा हात

लोणी,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील दीपक मुळेकर या तरुणाचा इमारतीवरून पडून काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्याने मुळेकर कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. या परिस्थितीची दखल घेत संगमनेर येथील संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठानने मुळेकर कुटुंबाला मदतीचा हात दिला.

दीपक मुळेकर हे इमारतीचे काम करीत असताना इमारतीवरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुःखद प्रसंगातून सावरत त्यांच्या कुटुंबीयांनी प्रवरा रुग्णालयात दीपक यांचे अवयवदान करून समाजापुढे मानवतेचा आदर्श निर्माण केला.

मुळेकर कुटुंब आर्थिक परिस्थितीशी सामना करीत असून, घरातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्याने कुटुंबापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या कुटुंबाची माहिती मिळाल्यानंतर संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्गापूर येथे भेट देत कुटुंबाला मदत केली.

संस्थेचे अध्यक्ष प्रा. चं. का. देशमुख यांच्या हस्ते मुळेकर कुटुंबाला ४ हजार रुपयांचा किराणा साहित्य सुपूर्द करण्यात आला. अडचणीत असलेल्या कुटुंबांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करण्याचे कार्य संस्थेकडून सातत्याने सुरू असून, आतापर्यंत २४२ कुटुंबांना मदत करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती शिर्के, व्यापारी शशिकांत मालपाणी, प्रकाश पुलाटे, ज्ञानेश्वर पानसरे, आबासाहेब पुलाटे, लक्ष्मण पुलाटे, दिलीप गोसावी, डॉ. अविनाश मनकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!