‘बिल्डिंग प्रवरा’तून विद्यार्थ्यांना उद्योजकतेची दिशा ठरणार

७७५ विद्यार्थ्यांचा सहभाग, १७२ स्टॉल्सची उभारणी

लोणी,(प्रतिनिधी):- बदलत्या काळात विद्यार्थ्यांना केवळ पदवीचे शिक्षण देणे पुरेसे नसून, त्यांच्यात उद्योजकतेची जाणीव, व्यावहारिक ज्ञान, आत्मविश्वास आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थी केवळ रोजगार शोधणारा न राहता भविष्यात इतरांना रोजगार देणारा उद्योजक व्हावा, या उद्देशाने लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने ‘बिल्डिंग प्रवरा’ उपक्रमांतर्गत बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी दिली.

‘बिल्डिंग प्रवरा’ अंतर्गत हा बिझनेस एक्स्पो २ ते ४ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. एक्स्पोचा शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हा एक्स्पो सर्वांसाठी खुला राहणार आहे.

या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी ‘बिल्डिंग प्रवरा’ची संकल्पना आणि उद्दिष्टांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच सामाजिक भान, व्यावहारिक अनुभव, आर्थिक व्यवहारांची समज आणि स्वतः काहीतरी निर्माण करण्याचा आत्मविश्वास मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसायाची संकल्पना, नियोजन, उत्पादन अथवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची पद्धत, बाजारपेठेचा अभ्यास तसेच व्यवसायातील आर्थिक व्यवहार यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या एक्स्पोमध्ये तब्बल ७७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून १७२ स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. विविध उत्पादने, नाविन्यपूर्ण कल्पना आणि व्यवसाय संकल्पना विद्यार्थी प्रत्यक्ष मांडणार आहेत. त्यामुळे वर्गातील ज्ञानाला कृतीची जोड मिळण्यासोबतच विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या प्रत्यक्ष जगाचा अनुभव घेता येणार आहे.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था केवळ शिक्षणापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग, व्यवसाय, कौशल्य विकास आणि सामाजिक जाणीव या क्षेत्रांत विविध उपक्रम राबवत आहे. ‘बिल्डिंग प्रवरा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात उद्योजकतेची बीजे रुजवून भविष्यात स्वतःचा व्यवसाय उभारण्यासोबतच इतरांना रोजगार देण्याची मानसिकता निर्माण करण्यावर भर दिला जात असल्याचे डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

“अहिल्यानगरचा विद्यार्थी रोजगार शोधणारा नव्हे, तर रोजगार निर्माण करणारा व्हावा, यासाठी त्याला योग्य संधी, मार्गदर्शन आणि व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. ‘बिल्डिंग प्रवरा’ हा त्याच दिशेने टाकलेला महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे,” असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

error: Content is protected !!