निमगाव जाळी परिसरातील एका हॉटेल मध्ये ग्राहकाला शिळे पाव देण्याचा प्रयत्न?

संगमनेर,(प्रतिनिधी):- संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी गावापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेल मध्ये ग्राहकाला शिळे पाव देण्याचा प्रयत्न झाला. या प्रकारामुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तसेच ग्राहकांशी कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी वर्तणूक याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक ग्राहक सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी या हॉटेलमध्ये गेला होता. त्याने मिसळ पावची ऑर्डर दिल्यानंतर पाव त्याच्यासमोर आणण्यात आले. मात्र, पाव तपासले असता ते शिळे असल्याचे ग्राहकाच्या निदर्शनास आले.

ग्राहकाने याबाबत संबंधित कर्मचाऱ्याला सांगून पाव बदलून देण्याची मागणी केली. मात्र, संबंधित कर्मचाऱ्याने पाव शिळे नसून त्यावरील भाग जळालेला असल्याचे सांगितले. ग्राहकाने पाव हाताने दाबून दाखवत ते शिळे असल्याचे सांगितले असता, उलट तुमचीच पाव खराब केले असा कर्मचारी म्हणाला.या प्रकारावरून ग्राहकाने संबंधित कर्मचाऱ्याला, “शिळे पाव बळजबरीने ग्राहकाला कसे काय खाऊ घालू शकता?” असा सवाल केला. त्यावेळी कर्मचाऱ्याकडून अरेरावीची भाषा केली.

खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार केल्यास संबंधित खाद्य आस्थापनाची तपासणी होऊ शकते. त्यामुळे हॉटेल मालकांनी आपल्या आस्थापनातील खाद्यपदार्थांची गुणवत्ता, साठवणूक आणि ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांची ताजेपणा याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

विशेषतः एखाद्या कर्मचाऱ्याकडून ग्राहकाला शिळा किंवा संशयास्पद खाद्यपदार्थ देण्याचा प्रकार होत असेल, तर त्याची जबाबदारी व्यवस्थापनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तत्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

“ग्राहक हा देवता” या भूमिकेची गरज

हॉटेल व्यवसायात ग्राहकांशी नम्रपणे आणि आदराने वागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खाद्यपदार्थाबाबत ग्राहकाने आक्षेप घेतल्यास त्याच्याशी वाद घालण्याऐवजी त्याची तक्रार समजून घेऊन समाधानकारक तोडगा काढणे आवश्यक आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित हॉटेल मालकाने आपल्या कर्मचारी व आचाऱ्यांना ग्राहकांशी योग्य पद्धतीने वागण्याच्या सूचना देण्याची गरज व्यक्त होत आहे. “ग्राहक हा देवता आहे; त्यांच्याशी आदराने आणि नम्रतेने बोला,” हा व्यवसायाचा मूलमंत्र कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्याची वेळ आली आहे.या प्रकरणाबाबत संबंधित हॉटेल व्यवस्थापनाची भूमिकेकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!